यवतमाळ : ‘लोकमत’चे आजचे वैभव सहजासहजी मिळालेले नाही. यासाठी अनेकांनी संघर्ष केला आहे. काम करताना मतभेद स्वाभाविक आहेत. मात्र, मनभेद नाहीत. बाबूजींनी दाखविलेल्या प्रेमाच्या, समतेच्या, एकात्मतेच्या मार्गानेच ‘लोकमत’ची वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी केले.
‘लोकमत’चे संस्थापक स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या जन्मशताब्दी वर्षास शनिवारी प्रारंभ झाला. यानिमित्ताने येथील दर्डा मातोश्री सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. मंचावर लोकमतचे एडिटर-एन-चीफ राजेंद्र दर्डा, माजी मंत्री ॲड. शिवाजीराव मोघे, ‘लोकमत’चे माजी संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, ‘लोकमत’चे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, समूह संपादक विजय बाविस्कर, ‘लोकमत समाचार’चे संपादक विकास मिश्र, ‘लोकमत टाईम्स’चे संपादक एन. के. नायक आदींची उपस्थिती होती.
महात्मा गांधीजींच्या विचारांनी बाबूजींची जडणघडण झाली. पुढे अनेक थोरांची त्यांना संगत लाभली. पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद, इंदिरा गांधी अशी दिग्गज मंडळी बाबूजींच्या निमंत्रणावरूनच यवतमाळला आली. पुढे सुभाषचंद्र बोस ते महात्मा गांधी, महात्मा गांधी ते पंडित नेहरू, पंडित नेहरू ते इंदिरा गांधी आणि इंदिरा गांधी ते गांधी परिवार असे सर्वांसोबत त्यांचे निकट संबंध राहिले.
जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन माणूस एकच आहे. या माणसाशी प्रेम करायला शिका, अशी शिकवण बाबूजींनी दिली. त्यांनी दिलेल्या समतेच्या, एकात्मतेच्या मार्गानेच आज ‘लोकमत’ची वाटचाल सुरू आहे. बाबूजींनी कधीही विचारांशी बेईमानी केली नाही, तर समाजातील शेवटच्या घटकाला न्याय देण्यासाठी ते अखेरच्या काळापर्यंत कार्यरत राहिले. त्यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्येही मोठे योगदान दिले. त्यामुळेच मंत्रिमंडळाची स्थापना होत असताना शरद पवार यांनी बाबूजींशिवाय कॅबिनेटची कल्पना करू शकत नाही, असे उद्गार काढले होते. बाबूजी खऱ्या अर्थाने तत्त्वज्ञानी होते. त्यांचा विचार पुढे ठेवूनच देवेंद्र दर्डा, ऋषी दर्डा, करण दर्डा ही ‘लोकमत’ची नवी पिढी वाटचाल करीत आहे. त्यामुळे यापुढील काळातही महाराष्ट्रात ‘लोकमत’च अग्रेसर राहील, असा विश्वासही विजय दर्डा यांनी व्यक्त केला. सूत्रसंचालन नागपूर ‘लोकमत’ आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने यांनी केले, तर आभार यवतमाळ जिल्हा कार्यालयप्रमुख किशोर दर्डा यांनी मानले.
बाबूजी खरे महानायक होते - राजेंद्र दर्डा
बाबूजींनी स्वातंत्र्य आंदोलनात पावणेदोन वर्षे तुरुंगवास भोगला. महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सहवासातूनच बाबूजींना स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्याची प्रेरणा मिळाली. देश स्वतंत्र झाल्यानंतर बाबूजींनी विधायक पत्रकारितेची सुरुवात केली. राज्याच्या मंत्रिमंडळात बाबूजींनी विविध खात्यांचे काम, जबाबदारी सांभाळली. त्यांच्या कर्तृत्वाने महाराष्ट्राची जडणघडण झाली. खऱ्या अर्थाने बाबूजी आमच्यासाठी महानायक होते, अशा शब्दात राजेंद्र दर्डा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.