मुख्यमंत्री कोण, याचा निर्णय जनताच घेईल; काँग्रेसचा ठाकरे गट आणि NCP ला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 08:12 AM2023-05-02T08:12:58+5:302023-05-02T08:13:22+5:30
ज्या पक्षाला जनता आशीर्वाद देईल त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
मुंबई - राज्यात मुख्यमंत्रिपदाची चर्चा सुरू असली तरी त्यावर आता भाष्य करण्याची गरज वाटत नाही. जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, ते प्रश्न हाती घेऊन काँग्रेस जनतेला न्याय देण्यासाठी लढत आहे. सध्या निवडणुका नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्रिपदावर चर्चा करण्यात काही अर्थ नाही. जे लोक त्यावर चर्चा करतात त्यांना करू द्या. मुख्यमंत्री कोण होणार, याचा निर्णय जनताच करेल. ज्या पक्षाला जनता आशीर्वाद देईल त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलत होते. यावेळी एससी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्याक विभागाचे प्रभारी के. राजू, आदिवासी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजीराव मोघे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुआ, सोनल पटेल, सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे, देवानंद पवार, राजन भोसले, राजेश शर्मा, मुनाफ हकिम, सोशल मीडियाचे राज्य प्रमुख विशाल मुत्तेमवार आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानभरपाई जमा करा
अवकाळी पाऊस व त्यानंतरच्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून अद्याप या नुकसानीचे पंचनामेही झालेले नाहीत. शासन व प्रशासनाला पंचनामे करण्यास वेळ नाही, असा आरोप करत सरकारने आता पंचनाम्यासाठी वेळ न घालवता शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ भरीव मदत जमा करावी, अशी मागणी यावेळी नाना पटोले यांनी केली.