मुंबई - २६/११ च्या हल्ल्यात दहशतवादी समुद्रीमार्गे मुंबईत घुसले. मुंबई विकलांग करण्याचे हे आंतरराष्ट्रीय कारस्थान होते. दहशतवाद्यांनी मुंबईच्या अनेक महत्त्वाच्या इमारतींवर, सार्वजनिक ठिकणांवर हल्ले केले. आमच्या पोलिसांनी झुंज दिली, हौताम्य पत्करलं आणि मुंबईचे रक्षण केले. मुंबई कमजोर करण्याचे प्रयत्न तेव्हा पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी केले. आता काही राजकीय लोकं करतायेत. त्यांच्या हातात बंदूक, बॉम्ब नसतील पण काहीही करून त्यांना मुंबई अस्थिर आणि विकलांग करून या शहराचे महत्त्व कमी करायचे आहे असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केला.
संजय राऊत म्हणाले की, आजचा दिवस राजकीय चर्चेचा नाही. जे निरपराध नागरीक या हल्ल्यात मारले गेले त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा आजचा दिवस आहे.जे पोलीस अधिकारी, शिपाई शहीद झाले त्यांना अभिवादन करण्याचा आज दिवस आहे. मुंबई आज सुरक्षित वाटत असली तरी लष्करी अधिकाऱ्यांचे बलिदान काश्मीर, मणिपूरमध्ये सुरू आहे. काश्मीरात गेल्या ८ दिवसांत ६ लष्करी अधिकाऱ्यांचे बलिदान झाले आहे.२ कॅप्टन, ४ सुरक्षा जवान यांचा समावेश आहे. मणिपूरमध्ये रोज पोलीस, लष्करावर हल्ले होतायेत. काश्मीर, मणिपूरमधील परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चाललीय त्याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे असं त्यांनी सांगितले.
२०२४ ची राजकीय लढाई ही संविधान वाचवण्यासाठीची...
आज संविधान दिवस आहे. देशाला संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांमुळे मिळाले. संविधानामुळे देशातील लोकशाही आणि स्वातंत्र्य मजबूत राहिले. पण गेल्या १० वर्षापासून नक्कीच संविधानाचे खासगीकरण सुरू आहे. संविधान कमजोर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. संविधानात हवे तसे आपल्या सोयीने बदल करून खासगी संविधान देशावर लादण्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणून हे संविधान वाचवण्याची जबाबदारी देशातील प्रत्येक नागरिकांवर आहे. २०२४ ची राजकीय लढाई ही देशातील संविधान वाचवण्यासाठीच होईल.संविधान नसेल तर हा देश राहणार नाही हे शिवसेनाही मान्य करते आणि देशातील प्रत्येक राजकीय पक्षाने हे सत्य स्वीकारले पाहिजे. देशातील संविधानावर ज्याप्रकारे हल्ले सुरू आहेत ते आपण एकत्रितपणे परतवून लावले पाहिजे असं विधान संजय राऊतांनी केले.
५ राज्यात भाजपा जिंकणार नाही
मिझारोममध्ये भाजपा जिंकणार नाही. तिथे काँग्रेसचं अस्तित्व आहे. पण मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड इथं मोदींची जादू चालणार नाही हे सूर्यप्रकाशाइतके सत्य झालेले आहे. तेलंगणात भाजपा कुठेही स्पर्धेत नाही. तेलंगणात भाजपानं कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तुम्ही केसीआर, एमआयएम यांना मतदान करा पण काँग्रेसला मतदान करू नका असा निरोप लोकांना दिलाय. ही भाजपाची रणनीती आहे.स्वत:येणार नसेल काँग्रेसला येऊ द्यायचे नाही. परंतु याही परिस्थितीत तेलंगणात काँग्रेसनं चांगली मुसंडी मारली आहे. तिथे चांगला निकाल लागेल.छत्तीसगड, मध्य प्रदेशात भाजपाचा दारूण पराभव होणार आहे. राजस्थानात अशोक गहलोत हे जादूगार आहेत. गहलोत यांनी देशाच्या पंतप्रधानांना आव्हान दिले आहे. राजस्थानाची राजकीय समीकरणे अशी असतात जो ५ वर्ष राज्य करतो तो पुढच्यावेळी निवडून येत नाही.पण यावेळेला ते चित्र बदलेल. सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, प्रियंका गांधी या सगळ्यांनी ५ राज्यात प्रचाराचं रान पेटवलं आहे.जनता त्यांच्या पाठिशी आहे.गांधी कुटुंबाची लाट आलीय असं रस्त्यावर जनतेचा महासागर उसळला होता त्यातून दिसले आहे.त्यामुळे ५ राज्यात ४ राज्याची लढत सरळ आहे. राजस्थानात अटीतटीची लढत असली तरी तिथे काँग्रेस बाजी मारेल हे चित्र राहुल गांधींनी निर्माण केलंय असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला.
...तर हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर मत मागण्याचा तुम्हाला अधिकार
भाजपा विकासाच्या कामावर मतदान का मागत नाही? रामलल्लाचे दर्शन मोफत घडवू यावर मतदान मागण्यापेक्षा काश्मीरात हिंदू पंडितांची घरवापसी करून दाखवली असती तर नक्कीच तुम्हाला हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर मत मागण्याचा अधिकार होता.तुम्ही २०१४ पासून काश्मीर पंडितांच्या प्रश्नावर मते मागतायेत. पण पुलवामा इथं आपल्या बेफिकीरीमुळे ४० जवानांच्या हत्या तुम्ही घडवल्या आहेत. तुम्हाला मते मागण्याचा अधिकारच नाही. रामलल्लाचे मोफत दर्शन हे निवडणूक आचारसंहितेचा भंग असून निवडणूक आयोगाने ताबडतोब नोटीस बजावायला हवी होती.भाजपाची मान्यता रद्द करायला हवी होती. भाजपावर निवडणूक आयोग कारवाई करत नाही असा आरोपही राऊतांनी केला आहे.