"देशात सौदेबाजीचे राजकारण, काँग्रेसचे आमदार विकले जाणार नाहीत", कमलनाथांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 12:32 PM2022-06-22T12:32:59+5:302022-06-22T12:34:51+5:30
Kamal Nath : काँग्रेसने सावध पवित्रा घेत राज्यात निर्माण झालेल्या राजकीय संकटावर चर्चा करण्यासाठी कमलनाथ (Kamal Nath) यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
मुंबई : विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेतील (Shiv Sena) अंतर्गत धुसफूस बाहेर आली आहे. शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे शिवसेनेते वरिष्ठ नेतृत्त्व कमालीचे अस्वस्थ झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी पक्षाशी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना महाराष्ट्राबाहेर नेलं आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर होण्याची चिन्हे आहेत.
याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने सावध पवित्रा घेत राज्यात निर्माण झालेल्या राजकीय संकटावर चर्चा करण्यासाठी कमलनाथ (Kamal Nath) यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. दरम्यान, काँग्रेस नेते कमलनाथ मुंबईत दाखल झाले आहे. यावेळी कमलनाथ म्हणाले की, "आज देशात सौदेबाजीचे राजकारण सुरू आहे. मध्य प्रदेशचे उदाहरण तुम्हाला माहीत आहे. हे राजकारण आपल्या संविधानाच्या विरोधात असून भविष्यासाठी धोक्याची बाब आहे. आपल्या आमदारांशी कसे बोलायचे हे शिवसेनेनेच ठरवायचे आहे. काँग्रेसचे आमदार विकाऊ नाहीत."
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेसह राज्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड पुकारणारे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे इतर शिवसेना आमदार गुवाहाटी येथे दाखल झाले आहेत. पहाटे तीनच्या सुमारास गुजरातमधील सूरत येथून निघालेले हे आमदार सकाळी सातच्या सुमारास गुवाहाटी येथे पोहोचले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रात निर्माण झालेल्या राजकीय संकटावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसने कमलनाथ यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. महाविकास आघाडीच्या घटकपक्षांसोबत कमलनाथ हे चर्चा करणार आहेत. यासंदर्भात काँग्रेसचे सचिव केसी वेणुगोपाल यांनी मंगळवारी पत्राद्वारे माहिती दिली होती . दरम्यान, कमलनाथ हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे विश्वासू नेते मानले जातात.
काँग्रेसला 10 आमदारांची चिंता
सोमवारी झालेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव झाला. काँग्रेसमध्येच क्रॉस व्होटिंग झाल्यामुळे आणि काही मत फुटल्यामुळे काँग्रेसच्या गोटातही चिंतेचे वातावरण आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली 10 आमदारांसह बाहेर पडण्याचा तयारीत असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. दरम्यान, विधान परिषदेच्या निकालानंतर नाराज झालेले राज्याचे मंत्री आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे विधीमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा देण्याच्या मनस्थितीत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला मोठे हादरे बसण्यास सुरुवात झाली आहे.