बारामती - शरद पवार यांच्या डिनर डिप्लोमसीचं राजकारण सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. नमो महारोजगार मेळाव्यानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे बारामतीत असणार आहेत. त्यावेळी शरद पवारांनी या तिघांना जेवणासाठी आमंत्रित केले. मात्र व्यस्त कार्यक्रमामुळे आपल्याला भोजनास उपस्थित राहता येणार नाही असं मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी शरद पवारांना कळवलं.
बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर नमो महारोजगार मेळावा पार पडणार आहे. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पत्र पाठवून तसेच फोनवरून शरद पवारांनी जेवणाचे निमंत्रण दिले. शरद पवारांच्या पत्रानंतर त्यांचे निकटवर्तीय नेते जयंत पाटील यांनी देखील वर्षा निवासस्थानी पोहचून शरद पवारांचे निमंत्रण दिले. शरद पवारांनी पाठवलेल्या या पत्रामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा उधाण आले.
याआधीही अनेकदा शरद पवारांनी त्यांच्या विरोधकांना घरी जेवणाचे निमंत्रण दिले होते. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही समावेश आहे. पवारांच्या या डिनर डिप्लोमसीतून सातत्याने त्यांच्याभोवती संभ्रमाचं वातावरण तयार होतं. त्याचा फायदाही पवारांना होतो. बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार उभे राहण्याची शक्यता आहे. त्याची तयारीही अजित पवारांनी केली आहे. त्यामुळे बारामतीत मुलीचा मतदारसंघ सुरक्षित राहावा यासाठी शरद पवार स्वत: मैदानात उतरले आहेत.
डिनर डिप्लोमसीतून शरद पवारांना काही वेगळी खेळी करायची होती का अशी शंका महायुतीच्या मनात होती. त्यामुळे पवारांच्या निमंत्रण पत्राला तितक्यात नम्रपणे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी नकार कळवला. बारामतीत पहिल्यांदा पवारविरुद्ध पवार असा सामना रंगतोय. यातच जर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शरद पवारांचे निमंत्रण स्वीकारून जेवायला गेले असते तर त्यातून निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांमध्ये वेगळा मेसेज पोहचला असता. माध्यमातही याचे निष्कर्ष काढले गेले असते आणि याचा फटका सुनेत्रा पवारांना बसला असता त्यामुळेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी जेवणासाठी पवारांच्या घरी जाणं टाळलं असं बोललं जाते.