सूड अन् बदल्याचे राजकारण हाच नरेंद्र मोदींचा अमृतकाळ; संजय राऊतांचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 11:13 AM2023-03-24T11:13:10+5:302023-03-24T11:13:56+5:30
ईडी, सीबीआयसारख्या संस्था केंद्राच्या दबावाखाली काम करतात. देशातील सर्वच तपास यंत्रणा सत्ताधाऱ्यांच्या बटीक आणि गुलाम झाल्यात.
नाशिक - जो सत्ताधाऱ्यांचा राजकीय विरोधक आहे त्यांच्या चूका शोधून काढल्या जातात. नसलेल्या चूका त्यांना मोठे केले जाते. सरकार पाडले जाते, पक्ष फोडला जातो हे लपून राहिले नाही आता उघड आहे. सूड आणि बदल्याचे राजकारण हाच नरेंद्र मोदींचा अमृतकाळ आहे अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, ईडी, सीबीआयसारख्या संस्था केंद्राच्या दबावाखाली काम करतात. देशातील सर्वच तपास यंत्रणा सत्ताधाऱ्यांच्या बटीक आणि गुलाम झाल्यात. भ्रष्टाचार हा एकाच पक्षाचा नसतो. जो सत्तेवर असतो त्याचा भ्रष्टाचार सर्वाधिक असतो. निवडणूक आयोग हा एकतर्फी काम करतोय. निवडणूक आयोग हा लोकशाहीचा कणा आहे तो कणाही मोदी सरकारने मोडून काढला असा आरोप त्यांनी केला.
त्याचसोबत ईव्हीएमबाबतही लोकांना शंका आहे. कालच्या शरद पवारांच्या नेतृत्वाखाली बैठकीत सर्वच विरोधी पक्षाची बैठक झाली. निवडणूक आयोगाची लफंगेगिरी यावर चर्चा केली जाते. ईव्हीएमची भूमिका आजची नाही. ईव्हीएमबाबत पहिला आवाज भाजपाने उचलला होता. सोमय्या आणि सुब्रह्मण्यम स्वामी यांनी पुराव्यासकट हे समोर आणले होते. बाळासाहेबांसमोरच सोमय्यांनी EVM हॅक कसे केले जाते हे दाखवले आहे. याच पुराव्याचा आधार घेत आम्ही पुढे रणनीती आखणार आहोत असंही राऊतांनी म्हटलं.
राहुल गांधींची खासदारकी रद्द व्हावी यासाठी आटापिटा
न्यायव्यवस्थेसाठी सरन्यायाधीश एकांगी लढतायेत. राहुल गांधी यांना ज्या खटल्यात २ वर्षाची शिक्षा झाली ती नरेंद्र मोदींची बदनामी झाली असेल तर मोदींनी खटला दाखल करायला हवा होता. अन्य कुणी येतो तो याचिका दाखल करतो त्यावर सुनावणी होऊन शिक्षा सुनावली जाते. राहुल गांधींची लोकसभा खासदारकी रद्द व्हावी यासाठी सगळा आटापिटा आहे. सूरतचा निकाल त्यासाठीच दिला असावा असा आरोपही खासदार संजय राऊतांनी केला आहे.