मुंबई - राहुल गांधी यांच्या मुंबईतील सभेनंतर शिंदेंची शिवसेनाकाँग्रेसला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे. मिलिंद देवरा, बाबा सिद्धिकी, अशोक चव्हाण यांच्यानंतर माजी खासदार प्रिया दत्त शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात प्रिया दत्त या शिवसेनेत सहभागी होऊ शकतात. २०१९ च्या निवडणुकीत पराभव झाल्यापासून प्रिया दत्त या काँग्रेसमध्ये बाजूला पडल्या होत्या.
काँग्रेसनं प्रिया दत्त यांच्यावर कुठलीही जबाबदारी सोपवली नव्हती. त्यामुळे आता २०२४ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रिया दत्त या काँग्रेसला रामराम करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रिया दत्त या माजी खासदार सुनील दत्त यांच्या कन्या असून बॉलिवूड अभिनेता संजय दत्त यांची बहिण आहे. प्रिया दत्त यांनी याबाबत सांगितले की, मी सध्या राजकारणात सक्रीय नाही परंतु सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सातत्याने लोकांच्या संपर्कात आहे. लोकांची सेवा करण्यासाठी राजकारणात असणं गरजेचे नसते. सध्या मी कुठल्याही पक्षाकडे उमेदवारी मागितली नाही असं त्यांनी म्हटलं.
प्रिया दत्त या २००९ च्या निवडणुकीत उत्तर मध्य मुंबई जागेवरून खासदार होत्या. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत भाजपाच्या पूनम महाजन यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर प्रिया दत्त या राजकारणात फारसा सक्रीय नव्हत्या. मात्र आता त्या पुन्हा एकदा राजकारणात सक्रीय होत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत. भाजपा, शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांची महायुती तर काँग्रेस, उद्धव ठाकरे, शरद पवार यांची महाविकास आघाडी यांच्यात ही लढत होणार आहे. भाजपाने आतापर्यंत २० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. आघाडीत रामदास आठवलेंच्या मनसे पक्षालाही स्थान आहे. आठवलेंनी राज्यात २ जागांची मागणी केली आहे.