एकीकडे अजित पवार गुलाबी कपडे घालून लाडकी बहीण योजनेचा प्रचार करत आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तरी ही योजना उपमुख्यमंत्र्यांच्या नावाने खपविली जात आहे. यावरून श्रेयवाद रंगलेला असतानाच बारामतीतून शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत बेबनाव असल्याची घटना घडली आहे.
बारामतीत अजित पवार गणेशोत्सवाच्या भेटीला आले नाहीत, म्हणून शिंदे सेनेच्या जिल्हाप्रमुखाने त्यांच्या फोटोलाच लावले काळे कापड लावले आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र जेवरे यांनी बारामतीतील शारदा प्रांगणामध्ये एकनाथ गणेशोत्सव साजरा केला आहे. राज्यात एकत्र आहेत म्हणून मंडळाच्या मंडपावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खासदार सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांचेही फोटो त्यांनी लावले होते. अजित पवार दर्शन घ्यायला भेट देतील या आशेवर जेवरे होते. परंतू अजित पवार आलेच नाहीत. यामुळे जेवरेंनी नाराज होऊन अजित पवारांच्या फोटोला काळ्या कापडाने झाकले आहे.
आधीच शिंदे गट अजित पवारांवर एवढी टीका करत असल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेनेत तणावाचे वातावरण आहे. अशातच अजित पवारांच्या फोटोला काळे कापड लावल्याचे समजताच बारामतीत तणाव वाढल्याने पोलिसांनी धाव घेत जेवरेंना ताब्यात घेतले आहे. महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बारामतीत अशी घटना घडल्याने पोलीस सतर्क झाले आहेत. अखेर पोलिसांच्या उपस्थितीत अजित पवारांचा बॅनर खाली घेण्यात आला.
जेवरेंचे म्हणणे काय...सुरेंद्र जेवरे यांनी सांगितले की, एकनाथ गणेशोत्सव साजरा करत असताना मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार आम्ही लोकाभिमुख कार्यक्रम ठेवले होते. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती मध्ये दौरा होता. या दौऱ्याच्या दरम्यान अजित पवार यांनी सर्व गणेशोत्सव मंडळांना भेटी दिल्या. अगदी छोट्या छोट्या तरुण मंडळाच्या गणपतीला देखील भेट दिली. मात्र आम्ही विनंती करूनही अजित पवार या मंडळाकडे फिरकले नाहीत. अजित पवार यांच्या कुटुंबातील सर्वांचे छायाचित्र या मंडळापुढे लावूनही कुटुंबातील हे कुणीही तिकडे फिरकले नाही. त्यामुळे आम्ही नाराजी व्यक्त केली, असे जेवरे म्हणाले.