गुणरत्न सदावर्तेंच्या गाड्यांची तोडफोड प्रकरणावरून राज्यातील वातावरण तापू लागले असून मराठा समाज आरक्षणावरून आक्रमक झाला आहे. सदावर्ते यांच्याविरोधात आता शिंदे गटाचे आमदार देखील प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. एकीकडे प्रसिद्ध क्रिमिनल लॉय़र सतीश मानशिंदे यांनी सदावर्तेंची गाडी फोडणाऱ्या आंदोलकांची केस फुकट लढणार असल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाच्या आमदाराने सदावर्तेंबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
गुणरत्न सदावर्ते यांच्या स्वभावामुळे महाराष्ट्रातल्या गोरगरीब मराठ्यांचे आरक्षण हिसकावल गेले आहे, असा आरोप शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. सदावर्तेंनी प्रखरपणे आरक्षणाविरोधातील बाजू कोर्टात मांडली, आणि हे गुणरत्न सदावर्ते जसे सूडाने पेटले होते. यांची जी गाडी तोडली ही शिक्षा कमी आहे का? गुणरत्न सदावर्तेंना संपवायला हवं होते, त्यांना संपवले असते तर मराठ्यांचा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला असता, असे वादग्रस्त वक्तव्य संजय गायकवाड यांनी केले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली आहे की, ते शांततेने आंदोलन करतील. मुख्यमंत्र्यानी दसरा मेळाव्यात लाखो लोकांच्या साक्षीने, शिवरायांच्या समोर शपथ घेऊन सांगितले की, मी आरक्षण दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. घाईघाईने आरक्षण दिल्यास मोठे नुकसान होईल. प्राण जाए पर वचन ना जाए, अशा प्रवृतीचे मुख्यमंत्री आहेत. सर्वांनी त्यांच्यावर विश्वास ठेवावा, असे गायकवाड यांनी म्हटले आहे.
नेत्यांना गावबंदी हा पर्याय असू शकत नाही. सुख दुःख कार्यक्रमात जावं लागेल. सामाजिक धार्मिक, लग्न कार्यात जावं लागेल. अस करू नका. शेवटी राजकारणात व्यक्ती स्वतंत्र आहे. घटनात्मक अधिकार हिरावून घेऊ नका, असे आवाहन अब्दुल सत्तार यांनी केले आहे.