सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निकाल दिला आहे. एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. उद्धव ठाकरेंनी स्वेच्छेने मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नसता तर आम्ही त्यांना पुन्हा मुख्यमंत्री पदी बसविले असते असे कोर्टाने म्हटले आहे. यावर उद्धव ठाकरेंची देखील प्रतिक्रिया आली आहे. मी राजीनामा दिला, कारण गद्दारांच्या समोर बहुमत चाचणी देणं मला मान्य नव्हतं. म्हणून मी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला, असे ठाकरे म्हणाले होते. यावर शिंदेंचे रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ शिंदेंचं सरकार थोड्या दिवसांसाठी वाचलेलं आहे. आमदारांच्या अपात्रतेची कारवाई कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे पाठविलेली आहे. ती पाठवताना स्पष्टपणे त्यावेळच्या राजकीय पक्षाचा व्हीप लागू होतो. सुनिल प्रभू तेव्हाचे व्हीप होते. त्यांनी बजावलेल्या व्हीपचे उल्लंघन झालेले आहे हे अतिशय स्पष्ट आहे. ते रेकॉर्डवर आहे. आता फक्त तांत्रिक गोष्टी राहिल्या आहेत, असे ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी म्हटले आहे. त्यांना भुमरे यांनी प्रत्यूत्तर देताना कोर्टाने सांगितले शिंदे सरकारला धोका नाही, अनिल परब कोण कोर्टापेक्षा मोठे आहेत का, असा सवाल केला आहे.
सगळ्या महाराष्ट्रात जल्लोष साजरा होत आहे. कोर्टाने दिलासा दिला आहे, आता मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला धोका नाही. धोका त्यांना आहे, कोर्टाने जो निकाल दिला तो मान्य आहे. खैरे पाण्यात देव बुडवून बसले आहेत. त्यांना म्हणा तुम्ही अशीच यज्ञ पुजा करत बसा. अनिल परब काय बोलले याला महत्त्व नाही, कोर्ट काय बोलते याला महत्व आहे. या राहिलेल्या आमदारांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भुमरे यांनी केली आहे.
वायफळ चर्चा करणार्यांना सुप्रीम कोर्टाने मारली चपराक - संजय गायकवाड विरोधकांना उकळ्या फुटत होत्या, बालिशपणाचे स्टेटमेंट करत होते, राऊत बकबक करत होते. कोर्टाने त्यांच्या चांगलीच कानफटात मारली आहे. याद्वारे अशा वायफळ चर्चा करणार्यांना ही एक सुप्रीम कोर्टाने चपराक मारली आहे, अशी प्रतिक्रिया सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे.