लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांचा रिपब्लिकन पक्षाने प्रामाणिकपणे प्रचार केला. मुंबईतही महायुतीच्या उमेदवारांना मनापासून साथ दिली. या एकजुटीमुळे मुंबईत सहा जागांवर महायुतीचाच विजय होणार. या विजयात रिपब्लिकन पक्षाचा सिंहाचा वाटा असेल, असे मत रिपाइं नेते रामदास आठवले यांनी व्यक्त केले. अंधेरीत झालेल्या पक्षाच्या मुंबई प्रदेश आढावा बैठकीत आठवले म्हणाले, निवडणुकीदरम्यान ज्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या विरोधात काम केले आहे, त्यांना पक्षातून निलंबित करण्यात येईल.
विविध जातींची समीकरणे जुळवणार
रिपब्लिकन पक्षात मातंग, अल्पसंख्याक, मराठा, गुजराती भाषीक अशा विविध आघाड्या असल्या तरी अन्य पक्ष रिपब्लिकन पक्षाला एकाच जातीचा पक्ष मानतात. त्यामुळे जातींची समिकरणे जुळवून मुंबई पालिकेत रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक निवडून आणण्याचा प्रयत्न राहणार आहे. कार्यकर्त्यांनी सर्वजाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम करावे, असे आवाहन आठवले यांनी केले.
विधानसभेच्या १० जागा, महापालिकाही लढणार
लोकसभा निवडणुकीत एकही जागा न लढविणारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष येत्या विधानसभा निवडणुकीत १० जागा लढविणार असून, यामध्ये मुंबईतील २ जागांचा समावेश आहे. त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेच्या २० जागांवर उमेदवार उभे करणार आहे, अशी घोषणा यावेळी आठवले यांनी केली.
मुंबई महापालिका निवडणुकीत दलितांसोबत मुस्लीम, मराठा, गुजराती भाषिक, उत्तर भारतीय अशा विविध जाती-धर्माच्या उमेदवारांना रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी देऊन रिपब्लिकन पक्षाची एकजातीय प्रतिमा पुसण्याचा प्रयत्न करणार आहोत, असेही आठवले यांनी सांगितले.