मुंबई : भारतीय जनता पक्षाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी तीन सरचिटणीसांची टीम स्थापन करून त्यांच्यावर पायाभूत रणनीती आखण्याची जबाबदारी सोपवली आहे.
सरचिटणीस विनोद तावडे, हे समितीचे निमंत्रक असतील तर सुनील बन्सल आणि तरुण चुग हे टीम म्हणून काम करणार असून, अन्य पदाधिकारी त्यांच्यासोबत असतील. पक्षाच्या केंद्रीय आणि राज्य कार्यकारिणीच्या वरिष्ठ नेत्यांचे कार्यक्रम ही टीम निश्चित करणार आहे. गेल्या निवडणुकीत ज्या मतदारसंघांत पक्षाचे उमेदवार दुसऱ्या स्थानी राहिले तेथील उमेदवार ठरवणे, राजकीय रणनीती ठरवणे, संघटनात्मक कार्यक्रम राबवणे आणि मतदारांना पक्षाशी जोडण्याचे काम ही टीम करणार आहे.
लोकसभा मतदारसंघानुसार मुद्यांची जुळवाजुळव करणे, वरिष्ठ नेत्यांच्या भाषणाचा मजकूर गोळा करणे आणि दळणवळणाच्या सुविधा पुरवण्याची जबाबदारी या सरचिटणीसांवर असेल.