मुंबई - राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील निकाल रविवारी लागले. यात प्रस्थापितांनी गड राखले असले तर काही ठिकाणी दिग्गजांना विजयाने हुलकावणी दिली. जळगावात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना तर धुळ्यात भाजप खा. डॉ. सुभाष भामरे यांना मतदारांनी धक्का दिला. एकनाथ खडसेंना बोदवड बाजार समिती आपल्याकडे राखण्यात यश आले.
जळगाव बाजार समितीत माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला १० जागा मिळाल्या. जळगावात धक्का बसलेल्या मंत्री गुलाबराव पाटील यांनी धरणगाव बाजार समितीत मात्र वर्चस्व कायम राखले. पाचोरा समिती त्रिशंकू असेल तर अमळनेर मविआ तर यावल समिती भाजप- सेनेकडे गेली आहे.
कोल्हापुरात आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, विनय कोरे, पी. एन. पाटील आदींच्या नेतृत्वाखालील ‘राजर्षी शाहू शेतकरी विकास’ आघाडीने १८ पैकी १६ जागा जिंकल्या. जयसिंगपूरमध्ये सर्वपक्षीय राजर्षी शाहू शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व राहिले. वसईत बहुजन विकास आघाडीने निर्विवाद वर्चस्व मिळवत सत्ता कायम राखली.
नांदेडमध्ये महाविकास आघाडीने १७ जागांवर यश मिळवत एकहाती सत्ता मिळवली. हिंगोलीतील जवळा बाजारमध्ये राष्ट्रवादी व शिवसेना ठाकरे गटाने विजय मिळविला. परभणी जिल्ह्यातील पाथरी व सोनपेठमध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलने बाजी मारली. बीडच्या माजलगाव बाजार समितीत आ. प्रकाश सोळंके यांच्या गटाने गड राखला. लातूर जिल्ह्यातील दहापैकी ५ महाविकास आघाडीकडे तर ५ बाजार समितीवर भाजपने विजय मिळविला. यवतमाळ जिल्ह्यात शिंदे गटाने राष्ट्रवादीच्या सोबतीने बोरीअरबमध्ये सत्ता राखली. झरी, मारेगाव, कळंब, राळेगावमध्ये महाविकास आघाडीने सत्ता मिळविली.