मुंबई - मुंबईला पावसाचा मारा शनिवारीदेखील कायम राहणार असून, पालघर आणि रायगड जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यानुसार या दोन जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, तर मुंबई शहर आणि उपनगरात साधारणपणे ढगाळ आकाश राहील आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळेल. काही ठिकाणी अधूनमधून जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे.
मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले की, कोकणात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. उत्तर प्रदेशच्या मध्यवर्ती भागावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्याचा वेग वाढला आहे. यामुळे कोकण किनारीपट्टीवर आणि मध्य महाराष्ट्राच्या अनेक परिसरात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. शनिवारीदेखील मुसळधार पावसाची शक्यता आहे.
कोकण, विदर्भ वगळता, मराठवाड्यात आठवडाभर तर मध्य महाराष्ट्रात १८ सप्टेंबरपासून पुढील ५ दिवस म्हणजे २३ सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता जाणवते. असे असले तरी मुंबईसह संपूर्ण कोकणातील ४ जिल्ह्यांत मात्र जोरदार पडत असलेल्या पावसाचे सातत्य व शक्यता कायम आहे. मान्सून परतीच्या पावसाचे वेध येत्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामान शास्त्र विभागाचे माजी अधिकारी माणिकराव खुळे यांनी सांगितले. सप्टेंबरअखेरपर्यंत पावसाची तीव्रता टिकून राहण्याची शक्यता आहे.