ठाणे : राज्यात गेल्या काही दिवसात घडलेल्या घडामोडींमुळे राजकीय वातावरण बदलले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी करत शिवसेनेत मोठी फूट पाडली आणि 40 हून अधिक आमदारांना आपल्यासोबत घेऊन भाजपसोबत राज्यात सत्ता स्थापन केली. बंड करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या आमदारांपैकी प्रताप सरनाईक यांचेही नाव घेतले जाते. दरम्यान, आमदार प्रताप सरनाईक यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी डोंबिवलीचा रिक्षावाला प्रताप सरनाईक आमदार आहे आणि ठाण्याचा रिक्षावाला एकनाथ शिंदे राज्याचा मुख्यमंत्री आहे. रिक्षावाल्यांना चांगले दिवस आल्याचे आम्हाला वाटत आहे, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
आमदार प्रताप सरनाईक म्हणाले, "शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस वाढत होती. त्यामुळे मी सर्व आमदारांची खदखद पत्राद्वारे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंच्या कानावरती घातली होती. त्यावेळी त्या पत्राची दखल घेतली नव्हती. परंतु मला या गोष्ठीचा आनंद वाटत आहे की, त्या पत्राची दखल राज्यातील शिवसेनेच्या 40 आमदार आणि 10 अपक्ष आमदारांनी घेतली. अभिमानास्पद गोष्ट आहे. एकनाथ शिंदे आणि मी एकत्र काम करत आलो. डोंबिवलीचा रिक्षावाला प्रताप सरनाईक आमदार आहे आणि ठाण्याचा रिक्षावाला राज्याचा मुख्यमंत्री आहे. रिक्षावाल्यांना चांगले दिवस आले आहेत, असे आम्हाला वाटत आहे."
ईडी म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस. ईडीचे सरकार राज्यात आले आहे. कंगना राणावत आणि अर्णव गोस्वामी यांच्या विरोधात हक्क भंग मांडला. शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून मी आवाज उठवला. त्यावेळी जी मदत सहकार्य मिळाले पाहिजे होते, ते मिळालेले नाही. मदतीची कुटुंबीयांना अपेक्षा होती, ती मिळाली नाही. वाढदिवसाच्या दिवशी देखील फोटो काढायला मिळालेले नाही. सीआरपीएफ जवान आता माझा सुरक्षेसाठी आहेत. कालचक्र कधी फिरेल हे सांगता येणार नाही. खऱ्या अर्थाने सुगीचे दिवस आले आहे. माझा मतदार संघात 300 कोटी निधी दिला आहे. शहरातील विकास कामे काशी करता येईल ते पाहू, असे आमदार प्रताप सरनाईक म्हणाले.
याचबरोबर, किरीट सोमय्या कोण देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री आहेत का? ते विरोधी होते, तेव्हा त्यांनी माझ्यावरती आरोप केले आणि त्यांच्या आरोपाला मी प्रत्युत्तर दिले. त्यांनी माझ्यावरती केस दाखल केली आहे. मी देखील त्यांच्यावरती केस दाखल केली आहे. त्यामुळे ही न्यायालयीन प्रक्रिया चालूच राहील. काँग्रेसला स्वतःचे आमदार टिकवायचे आहेत म्हणून ते आरोप करणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्याबाबत विश्वास दर्शक ठराव झाला, तेव्हा काँग्रेसचे आमदार अनुपस्थित होते. तर सरकार टिकेल की नाही, हे त्यांनी सांगू नये. सर्व ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवकांचा कौतुक करायला पाहिजे एक दोन नव्हे तर 66 नगरसेवक हे एकनाथ शिंदे यांना जाहीर पाठिंबा देत आहे. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, मीरा-भाईंदर, नवी मुंबईतील सर्व नगरसेवक आमच्या सोबत आहेत, असेही आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.