लोकमत न्यूज नेटवर्क, किणी: महापुरामुळे वारणा नदीकाठचे ऊस, सोयाबीन, भात, भुईमूग आदी पिके अक्षरश: कुजून गेली असून, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. पिकांचे नुकसान पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. वारणाकाठ सुपीक जमिनीचा काठ म्हणून ओळखला जातो. येथील शेतकरी चांगल्या पद्धतीने ऊस, सोयाबीन, भात, भुईमूग, भाजीपाला पिकवतात; मात्र दर एक-दोन वर्षाने महापुराचा फटका बसत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. यावर्षीही आलेल्या महापुराचे पाणी तब्बल आठ दिवस शेतामध्ये राहिल्याने हातातोंडाशी आलेली पिके अक्षरश: कुजून गेली आहेत.
सोयाबीनच्या केवळ काटक्या, उसाची चिपाडे शिल्लक राहिली आहेत. घातलेले पैसे बुडाले असून कुजलेले पीक काढून शेत रिकामे करण्यासाठी खर्चाचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. वारंवार पूर परिस्थिती निर्माण होत असल्याने शेती करणे अवघड बनले असल्याने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे. पुलासाठी टाकलेले भराव यामुळे महापुराची तीव्रता वाढत आहे. याबाबत उपापयोजना करण्याची मागणी होत आहे.
महापुराचा फटका वारंवार बसत आहे. यावर्षी तब्बल दहा दिवस शेतामध्ये पाणी राहिल्याने पिके कुजून गेल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. -महावीर कोले, शेतकरी