मुंबई : बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर नागपूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसचा भीषण अपघात झाला. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजाजवळ बसचे टायर फुटल्याने ही बस रस्त्यावर उलटली. यानंतर काही क्षणातच बसने पेट घेतला. या अपघातात बसमधील २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. दरम्यान, या अपघातावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप होताना दिसून येत आहेत. या घटनेवर भाष्य करताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अनेकांचे शाप आणि अश्रू त्या रस्त्यामध्ये दिसतात, असे म्हटले आहे. तर ज्या मार्गाला शापित म्हणताय, त्याचे नाव हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहे, असे म्हणत आमदार रवी राणा यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे.
बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातानंतर आमदार रवी राणा यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. समृद्धी महामार्ग हा मुंबईपासून विदर्भाला जोडणारा मार्ग आहे. टेक्निकल टीमने बसून यावर अभ्यास केला पाहिजे. संजय राऊत ज्या मार्गाला शापित म्हणतात, त्या मार्गाच नाव हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहे. त्याला शापित म्हणणं हे चुकीचे आहे आणि संजय राऊत हे उद्धव ठाकरेंसाठी शापित आहेत, असे म्हणत रवी राणा यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
याचबरोबर, रवी राणा यांच्या पत्नी आणि खासदार नवनीत राणा यांनीही संजय राऊतांच्या विधानावर पलटवार केला आहे. त्या म्हणाल्या की, संजय राऊत हे उद्धव ठाकरेंसाठी शापित आहेत. तर या अपघातावर राजकारण करू नये. तसेच, राजकारण करणाऱ्याचे दु:ख वाटते, तर संजय राऊत यांच्या बातम्या माध्यमांनी दाखवू नये. वारंवार होत असलेल्या अपघातावर तज्ज्ञ लोकांनी अभ्यास करावा. तसेच,येणाऱ्या काळात समृद्धी महामार्गावरील अपघात कसे थांबतील याकडे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री लक्ष देतील, असे नवनीत राणा यांनी सांगितले.
काय म्हणाले संजय राऊत?समृद्धी महामार्गावर झालेला अपघात हा गेल्या वर्षभरामध्ये झालेल्या अपघातामधील मोठा अपघात आहे. समृद्धीवरील अपघातांचे प्रमाण वाढले आहे. २५ लोक ज्या पद्धतीने मरण पावले हे दुर्दैवी आहे. समृद्धी महामार्ग हा शापित महामार्ग झाला आहे. तो शापित का झाला त्याच्या खोलात जावे लागेल. ज्या पद्धतीने तो महामार्ग बनवण्यासाठी सरकारने निर्णय केले. त्या अनेक गोष्टी तपासाव्या लागतील. भविष्यात त्या सर्व गोष्टी समोर येतील. दुर्दैवाने त्या रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत, लोक मृत्यू होत आहेत हे काही चांगले नाही, किती वेळा श्रद्धांजली वहायच्या, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच, वेग मर्यादेसंदर्भात आम्ही अनेकदा मागणी केली. त्यासंदर्भात काही होत नाही. समृद्धी महामार्ग भ्रष्टाचाराने तयार झाला आहे. अनेकांच्या जमिनी त्यासाठी हडप करण्यात आल्या जबरदस्तीने घेण्यात आल्या. अनेकांचे शाप आणि अश्रू त्या रस्त्यामध्ये मला दिसतात आणि म्हणून तर अपघात होत नाहीत ना, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
विदर्भ ट्रॅव्हल्सचा भीषण अपघातदरम्यान, विदर्भ ट्रॅव्हल्सची एमएच २९ बीई-१८१९ क्रमांकाची ही बस समृद्धी महामार्गावरून नागपूरहून पुण्याकडे जात होती. ३० जून रोजी नागपूरहून सायंकाळी ५ वाजता पुण्यासाठी ही बस निघाली होती. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ १ जुलैच्या रात्री १.२२ मिनिटाने धावत्या गाडीचे समोरील टायर अचानक निघाल्याने ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून पलटी झाली. त्यानंतर काही मिनिटामध्ये पेट घेतल्यानंतर गाडीचा स्फोट होऊन ही खासगी प्रवाशी बस पेटली. त्यानंतर बसमध्ये असणाऱ्या ३३ प्रवाशांपैकी आठ प्रवासी सुखरुप बाहेर पडले. तर २५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. सुखरुप बाहेर पडलेल्यांमध्ये चालक आणि वाहकाचा समावेश आहे. दरम्यान, जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे. यातील बहुतांश प्रवाशी हे नागपूर, वर्धा आणि यवतमाळचे आहेत.