भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्य नगरी उदगीर (जि. लातूर) : छत्रपती शिवरायांचे आज्ञापत्र हे कालातीत आहे. कोणत्याही काळात, कोणत्याही राज्यकर्त्यांना ते उपयुक्त ठरणारे आहे. राजकारण्यांनी हे आज्ञापत्र बारकाईने वाचून तसा अंमल राज्य कारभारात केला तर नक्कीच प्रजाहित साधले जाऊ शकते, असा सूर अभ्यासकांनी रविवारी चर्चेतून काढला.
साहित्य संमेलनातील छत्रपती शाहू महाराज सभामंडपात रविवारी सकाळी आज्ञापत्र या ग्रंथावर चर्चा झाली. यात अभ्यासक अविनाश कोल्हे, राजा दीक्षित, सुरेश शिंदे, गणेश मोहिते यांनी सहभाग घेतला. या चर्चेतून छत्रपती शिवरायांनी गड, किल्ले, कडे, आरमार, प्रजा, शेतकरी यासह विविध घटकांच्या बाबतीत अत्यंत बारकाईने अभ्यासपूर्वक काढलेल्या आज्ञापत्रांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यात आली. अगदी आज्ञापत्रातील भाषेचे सौंदर्यही येथे अधोरेखित करण्यात आले. प्रजाहित साधण्यासाठी, राज्य कारभार हाकण्यासाठी महसुलाचे महत्त्व जाणून भूमिदानाबाबत त्यांनी घालून दिलेली तत्त्वे आजच्या काळातही अत्यंत उपयुक्त असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले.
दिव्याची वात उंदीर नेतील, गंजी जाळतील...छत्रपती शिवरायांनी शेतकऱ्यांची किती काळजी घेतली होती, हे दिव्यांच्या उदाहरणावरून स्पष्ट होते. आपल्या आरमारास ते रात्री झोपताना दिवे बंद करण्यास आज्ञापत्रातून सांगत. दिवा चालू ठेवल्यास उंदीर वात पळवतील व शेतकऱ्यांच्या गंजीवर टाकतील. गंजी जळाल्यास शेतकऱ्यांचे वर्षभराचे धान्य नष्ट होईल, इतका बारकावा यातून दिसतो. भाजीच्या देठालाही हात लावू नका, हे सांगणेही या काळजीचेच प्रतीक. आजच्या राज्यकर्त्यांनी इतक्या बारकाव्याने शेतकऱ्यांची काळजी घेतल्यास आत्महत्या थांबतील, असा सूरही अभ्यासकांनी काढला.