"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 05:51 PM2024-11-07T17:51:33+5:302024-11-07T17:52:30+5:30
"विकासासाठी कुठूण पैसा आणणार माहीत नाही. कारण केंद्र सरकार त्यांच्या विचाराचे नाही. त्यामुळे यांना तिकडून विकासासाठी फार काही मिळेल अशातला काही भाग नाही. उगाचच काहीतरी सांगायचं."
महाराष्ट्रात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच पक्ष आश्वासनांची खैरात वाटताना दिसत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात तर आश्वासनांची स्पर्धाच बघायला मिळत आहे. महाविकास आघाडीच्या प्रचाराला बुधवारी मुंबईतून संयुक्त सभेद्वारे सुरुवात झाली. यावेळी, महाविकास आघाडीने जनतेला ५ गॅरंटी अथवा आश्वासने दिली आहेत. यात, महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला ३००० रुपये, महिला व मुलींना मोफत बस प्रवास आणि बेरोजगार तरुणांना दर महिन्याला ४००० रुपयांपर्यंत मदत. आदी योजनांचा समावेश आहे. यासंदर्भात आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते पुण्यात पत्रकारांसोबत बोलत होते.
उगाचच काहीतरी सांगायचं...!
यासंदर्भात बोलताना पवार म्हणाले, "विकासासाठी कुठूण पैसा आणणार माहीत नाही. कारण केंद्र सरकार त्यांच्या विचाराचे नाही. त्यामुळे यांना तिकडून विकासासाठी फार काही मिळेल अशातला काही भाग नाही. उगाचच काहीतरी सांगायचं. पटेल असं तरी..." एवढेच नाही तर, "आमच्यावर टीका करताना..., आम्ही या सर्व योजना साधारणपणे 75 हजार कोटीपर्यंत घेऊन गेलो होतो. आताच्या त्यांच्या सर्व योजना एकत्रित केल्यानतंर, त्या रकमा आणि ते लाभार्थी बघितले, तर ते जातंय 3 लाख कोटींपर्यंत. ही फॅक्ट आहे," असेही अजित दादा म्हणाले.
ही निव्वळ महाराष्ट्र राज्यातील मतदारांची फसवणूक -
तुमचे बघूनच त्यांनी केले, म्हणजे स्पर्धा सुरू झाली? असे विचारले असता, अजित दादा म्हणाले, "स्पर्धा नाही हो, तुम्ही आम्हाला म्हणत होतात की, तुम्ही देऊ शकणार नाही आणि तुम्ही त्याची दुप्पट वाढ, तिप्पट वाढ, चौपट वाढ करताय. हे कसं मग शक्य आहे? तुम्ही काय जादूची कांडी फिरवणार आहात? काय करणार आहात? हे बरोबर नाही, ही निव्वळ महाराष्ट्र राज्यातील मतदारांची फसवणूक आहे."