मुंबई : शालेय बसचालक पॅनिक बटन आणि जीपीएस ट्रेकिंग, आदी नियमांकडे दुर्लक्ष करीत निष्काळजीपणे विद्यार्थ्यांची वाहतूक करतात. त्यामुळे विद्यार्थी वाहतूक करणारी वाहने वेळेत पोहोचत नाहीत. त्यामुळे पालकांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे राज्यभरातील शालेय बसेसची तपासणी करून मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार कारवाईचे आदेश प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना परिवहन आयुक्तांनी दिले आहे.
एप्रिल महिन्यात मुंबईतील पोदार इंटरनॅशनल शाळेची बस पाच तास बेपत्ता झाली होती. बसमध्ये १५ विद्यार्थी होते. विद्यार्थी वेळेत घरी पोहोचले नसल्याने पालकांच्या तोंडचे पाणी पळाले. त्यानंतर शाळा प्रशासन आणि पालकांमध्ये वाद होऊन मुंबईत बसची शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. अखेर पाच तासांच्या शोधमोहिमेनंतर विद्यार्थी सुरक्षित आणि सुखरूपरीत्या घरी पोहोचले व पालकांच्या जिवात जीव आला. त्या बसवरील चालक नवीन असल्याने त्याला रस्ते माहीत नव्हते. शिवाय त्याचा फोनसुद्धा लागत नसल्याने हा गोंधळ उडाला होता. त्यामुळे शाळा प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली होती. यासह अनेक घटना राज्यात अनेक ठिकाणी घडत असल्याच्या तक्रारी परिवहन आयुक्तांकडे प्राप्त झाल्या आहे. त्यामुळे आता परिवहन विभागाने केंद्रीय अधिसूचनेची प्रत जोडलेले शाळा बसेसवरील कारवाईचे आदेश राज्यातील प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना पाठवले आहे.
काय होणार तपासणी?
- शालेय बसमध्ये जीपीएस यंत्रणा, पॅनिक बटण अशा यंत्रणा लावण्यात आल्या आहेत का?
- या यंत्रणा सुरू आहेत का? याशिवाय चालक प्रशिक्षित आहेत का? आणि शालेय बसेससाठी आखून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन केले जात आहे का?
- या दृष्टीने आता परिवहन विभागाकडून राज्यातील शाळेच्या बसेसवर कारवाई केली जाणार असल्याचे परिवहन विभागाने सांगितले आहे.
बस कशी असावी ?बसची यांत्रिक स्थिती उत्तम असणे आवश्यक आहे. नियमानुसार बस १५ वर्षांपेक्षा अधिक जुनी नसावी. शाळेची बस किंवा विद्यार्थ्यांची ने-आण करणारे वाहन हे पिवळ्या रंगाचे असावे. बसच्या दोन्ही बाजूच्या खिडक्यांखाली आणि पुढे चॉकलेटी रंगाचा पट्टा असावा. या पट्ट्यावर शाळेचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, बस कंत्राटी असल्यास त्याचे तपशील पांढऱ्या रंगाने लिहिलेले असणे आवश्यक आहे.
मुंबईत रस्ते चांगले नाहीत. मेट्रोची कामे सुरू आहेत. त्यामुळे वाहतूककोंडी होते. त्यामुळे बसला उशीर होत आहे. आम्ही गाड्यांमध्ये जीपीएस आणि सीसीटीव्ही लावले आहेत. अनधिकृत गाड्यांची संख्या वाढली आहे. त्यांच्यावर कारवाई होत नाही. आम्ही नियमांचे पालन करून गाड्या चालवत आहोत; तरीही त्रास दिल्यास संप पुकारला जाईल. अनिल गर्ग,अध्यक्ष, स्कूल बस ओनर्स असोसिएशन