"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2024 04:47 PM2024-06-02T16:47:21+5:302024-06-02T18:52:31+5:30
Nana Patole : खासदार संजय राऊत यांच्या लेखातील वक्तव्यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे.
Sanjay Raut vs Nana Patole : लोकसभा निवडणुकीत सांगली लोकसभेच्या जागेवरुन महाविकास आघाडीमध्ये मोठा पेच निर्माण झाला होता. सांगलीच्या जागेवरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात तू तू मै मै सुरु झालं होतं. काँग्रसेच्या नेत्यांना नौटंकी बंद करण्याचे आवाहन केल्याचे संजय राऊत म्हणाले होते. त्यावर प्रत्युत्तर देताना नाना पटोले यांनी संजय राऊतांनी आपली नौटंकी थांबवावी असं म्हटलं होतं. आता निवडणूक संपल्यानंतर पु्न्हा एकदा दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरु झाल्याचे पाहायला मिळतय.
ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनातील एका लेखावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे. ७० वर्षात भारताने लोकशाहीचा साफ कचरा केल्याचे संजय राऊतांनी म्हटलं आहे. यावरुनच नाना पटोले यांनी संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. संविधान वाचवण्याचे काम काँग्रेसने केल्याचे प्रत्युत्तर नाना पटोलेंनी राऊतांना दिलंय.
"तुम्ही १०० टक्के राजकारण करत असाल, तर आम्ही २० टक्के राजकारण आणि ८० समाजकारण करतो. संजय राऊत ज्या शाळेत शिकले ती काँग्रेसने निर्माण केली होती. त्यांच्या गावात पाणी, दवाखाना, त्यांचे बाळंतपण जिथे झाले ते काँग्रेसने निर्माण केलं होतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान टिकवण्याचे कामही काँग्रेसनेच केले आहे. त्यामुळे मी त्यांच्यावर काय प्रतिक्रिया देणार. संजय राऊत अतिविद्वान आहेत आणि कालच ते लंडनहून आलेले आहेत. त्यामुळे तिथून ते काय जास्त शिकून आलेत ते मला माहिती नाही," असा खोचक टोला नाना पटोले यांनी लगावला.
संजय राऊतांनी नेमकं काय म्हटलं?
खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या लेखात इंग्लंडमधील निवडणुकीच्या पद्धतीबाबत माहिती दिली. तसेच त्यांनी भारतातल्या निवडणूक पद्धतीबाबतही भाष्य केलं. "सत्तर वर्षांत भारताने लोकशाहीचा साफ कचरा केला. गेल्या दहा वर्षांत तो सगळय़ात जास्त झाला, पण इंग्लंडमध्ये लोकशाहीची मशाल पेटताना दिसत आहे. भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे लोकशाही मार्गाने संसदेत निवडून आले व इंग्लंडच्या संकटकाळात ते त्या महान देशाचे पंतप्रधान झाले. ज्या देशावर आम्ही राज्य केले त्या देशाचा माणूस आम्हाला पंतप्रधान म्हणून चालणार नाही, असे गळा फाडून बोलणारा नकली राष्ट्रवाद तेथे सुनक यांना विरोध करण्यास उभा राहिला नाही," असे संजय राऊत यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे.