मुंबई : राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश आणि तेलंगणाच्या लगतच्या भागात तापमान ४० अंशांवर पोहोचले आहे. मुंबईसह राज्यभरात वाढत्या पाऱ्याने नागरिकांना घाम फोडला असून, मार्चच्या मध्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या पार गेला. एप्रिल व मे महिन्यात यात आणखी भर पडणार असून, त्यामुळे तूर्तास तरी उष्णतेपासून दिलासा मिळण्याची आशा नाही.
मुंबईकरांनी १३ ते १७ मार्च असे पाच दिवस कडक उन्हात काढले. मुंबईत २३ मार्च रोजी कमाल तापमान ३८.२ अंशांवर पोहोचल्याने उष्मा पुन्हा शिगेला पोहोचला. उत्तर-पश्चिम मैदानी भागातही पारा वाढत आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटेने जमीन तापत आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या डोंगराळ राज्यांमध्येही उष्णता जाणवत आहे. राजस्थान आणि लगतच्या पाकिस्तानमध्ये अडथळा नसल्यामुळे उबदार वारे उत्तर आणि मध्य भारताकडे सरकत आहेत. वारा आणि कोरडे हवामान वायव्य भारतात पुन्हा एकदा तापमान वाढवेल. ज्यामुळे उष्णतेची लाट निर्माण होईल. हळूहळू उत्तर-मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही उष्णतेच्या लाटेचा प्रभाव दिसून येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मार्चच्या अखेरीस मध्य आणि उत्तर-पश्चिम भारताच्या काही भागांमध्ये उष्णतेचा तडाखा बसेल, अशी अपेक्षा होती. परंतु ती इतक्या लवकर असे होईल, अशी अपेक्षा नव्हती. पण हे आश्चर्यकारक नाही. कारण गेल्या काही वर्षांत आपण दिवसाच्या तापमानात हळूहळू वाढ होत असल्याचे पाहत आहोत. कमाल तापमान विक्रम मोडत आहे व जागतिक तापमानात वाढ होत आहे.- महेश पलावत, हवामानशास्त्र, स्कायमेट वेदर
उष्णतेचे परिणाम कोणत्याही एका शहरात समान प्रमाणात जाणवत नाहीत. ज्या लोकांना सेल्फ-कूलिंग उपकरणे उपलब्ध नाहीत किंवा ज्यांना बाहेर काम करावे लागते, जसे की मजूर, रस्त्यावरील विक्रेते. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की तीव्र उष्णतेच्या लाटांवरील उपायांचेही भिन्न परिणाम होऊ शकतात. म्हणून अति उष्णतेचे विषम परिणाम लक्षात ठेवणे गरजेचे आहे.- डॉ. चांदनी सिंग, वरिष्ठ संशोधक, इंडियन इन्स्टिट्यूट फॉर ह्युमन सेटलमेंट्स