मुंबई - महाराष्ट्रात ६ महिन्यापूर्वी सत्तांतर घडले. महाविकास आघाडी सरकार कोसळले अन् एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले. राज्यात शिंदे-फडणवीस जोडीचे सरकार आले. या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होण्यासाठी ३० दिवसांची वाट पाहावी लागली. त्यानंतर राज्य सरकारचा पहिला मंत्रिमंडळ शपथविधी सोहळा पार पडला. यात अनपेक्षितपणे अनेकांना डच्चू देण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळेल या अपेक्षेवर अनेक नेते आहेत.
त्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत स्पष्टच भाष्य करत संकेत दिले आहेत. मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार असा प्रश्न सातत्याने राज्याच्या राजकारणात विचारला जात आहे. त्यासह इच्छुक नेतेही या प्रश्नाचं उत्तर शोधत आहेत. त्यावर फडणवीसांनी उत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराला कुठलीही कायदेशीर अडचण नसल्याचं स्पष्ट केले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कायदेशीर आणि घटनात्मक हे सरकार स्थापन करून कार्यरत आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाला पाहिजे हे मलादेखील वाटते. कारण इतकी खाती सांभाळयची त्यापेक्षा आपल्याकडे दोन सभागृह आहेत. तेव्हा एकाच वेळी सभागृहात एकच चर्चा होते. त्यावेळी ओढताण होते. त्यामुळे विस्तार आम्हाला करायचा आहे आणि तो आम्ही करू असं त्यांनी म्हटलं.
तसेच या विस्तारामध्ये कायदेशीर आणि संविधानिक कुठलीही अडचण नाही. योग्यवेळी हा विस्तार आम्ही करू. शक्यतोवर हा मंत्रिमंडळाचा विस्तार अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच हा विस्तार करायचा आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यामुळे २७ फेब्रुवारीपर्यंत शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची दाट शक्यता आता वर्तवण्यात येत आहे.
सध्याच्या मंत्रिमंडळात एकूण २० मंत्री आहेत. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्वाधिक खाती आहेत. ९ शिंदे गटाचे आणि ९ भाजपाचे मंत्री आहेत. शिंदे फडणवीस सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार मागील ४ महिन्यापासून रखडला आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी हा विस्तार होईल असं सांगण्यात आले होते. परंतु तो अद्यापही झाला नाही. त्यामुळे शिंदे-फडणवीस यांच्याकडील मंत्रिपदासाठी इच्छुक अनेक नेते नाराज असल्याची चर्चा आहे. त्यात प्रामुख्याने प्रहारचे आमदार बच्चू कडू यांचा समावेश आहे. कारण मविआ सरकारमध्ये बच्चू कडू यांच्याकडे राज्यमंत्रिपदाची जबाबदारी होती. मंत्री असतानाही कडू यांनी शिंदेंना पाठिंबा देण्यासाठी सरकारमधून बाहेर पडले.