लोकमत न्यूज नेटवर्कबदलापूर : बदलापूर शहरात गुरुवारी मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आलेल्या निरीक्षकांसमोरच माजी खासदार कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे यांचे समर्थक आपसात भिडले. हा वाद वाढल्यामुळे निरीक्षकांना ही बैठक रद्द करावी लागली. त्यानंतर दोन्ही गट पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले.
भाजपच्या प्रदेश कार्यालयाने प्रत्येक मतदारसंघात आढावा बैठक घेतली होती. यासाठी बदलापुरात कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्रित आले होते. यात कथोरे आणि पाटीलसमर्थक असे दोन गट आल्यामुळे काही प्रमाणात वाद झाले. कार्यकारिणीच्या सदस्यांवरून दोन गटात वाद वाढल्यानंतर हे प्रकरण हाणामारीपर्यंत गेले. पक्षाचे निरीक्षक गोपाळ शेट्टी यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या बैठकीत हा प्रकार घडल्यानंतर त्यांनी ही बैठकच रद्द केली. आमदार कथोरे यांचे समर्थक अंबरनाथ तालुका अध्यक्ष राजेश पाटील आणि पाटील यांचे समर्थक ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष मधुकर मोहपे यांच्यात हा वाद झाला.
नेमके घडले काय? निरीक्षक गोपाळ शेट्टी हे मतदारसंघातील इच्छुक उमेदवार यासंदर्भात माहिती घेण्यासाठी आले होते. सोबतच मतदारसंघातील सर्व मंडळप्रमुखांना आणि पदाधिकाऱ्यांना त्यांची मते मांडण्यासाठी बोलावले होते.
पाटील गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी कथोरे गटातील मुख्य पदाधिकाऱ्यांची नावेच मंडळाच्या सूचीतून वगळल्यामुळे वातावरण तापले होते. कथोरेसमर्थक उमेदवाराचा प्राधान्यक्रम देऊ नये, अशी रणनीती आखली होती. त्यावरूनच हा वाद वाढला आणि तो पोलिस ठाण्यापर्यंत गेला.
तक्रार देण्यास नकारवाद सोडवण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये तुरळक हाणामारी झाली. यादरम्यान मोहपे यांच्या खासगी सुरक्षारक्षकाने रिव्हॉल्व्हर काढल्यामुळे तणाव निर्माण झाला. दोन्ही गट बदलापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. मात्र, पक्षाकडून आदेश आल्यानंतर बदनामी होऊ नये, यासाठी दोन्ही गटांनी तक्रार देण्यास नकार दिला.