NCP Ajit Pawar ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात राजकीय नेत्यांच्या पक्षांतराला वेग आला असून उमेदवारीच्या शोधात नेत्यांकडून नवनव्या पर्यायांचा शोध सुरू आहे. लोकसभा निवडणुकीतील निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात येणाऱ्या नेत्यांचा ओघ वाढला असून सत्ताधारी महायुतीचे अनेक नेते तुतारी हाती घेण्याच्या तयारीत असल्याचा दावा पवारांच्या राष्ट्रवादीकडून केला जातो. अशातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गौप्यस्फोट करत राज्यातील एका मोठ्या नेत्याने आपल्या पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केल्याचं म्हटलं आहे.
कार्यकर्त्यांशी संवाद साधताना जयंत पाटील म्हणाले की, "परवा एका मोठ्या नेत्याने आपल्या पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली. या नेत्याने मला सांगितलं की, तुम्ही तुतारी हाती घ्या, असं आम्हाला मतदारसंघात फिरल्यानंतर लोक सांगत आहेत. तुतारी घेतली नाही तर आपलं काही खरं नाही, असंही लोक बोलत असल्याचं या नेत्याने मला सांगितलं," असा दावा पाटील यांनी केला आहे.
दरम्यान, "तुतारी हाती घेतल्याशिवाय महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघांमध्ये आपण निवडून येऊ शकत नाही, असं अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना वाटत आहे, हीच शरद पवार यांची ताकद आहे," असंही जयंत पाटील यावेळी म्हणाले.
तुतारी हाती घेण्याच्या तयारीत असणारे नेते कोणते?
इंदापूर विधानसभेची जागा महायुतीच्या जागावाटपात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता असल्याने भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील अस्वस्थ असल्याचं दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यातून त्यांनी पक्षाबाबतची नाराजी व्यक्त केली होती. तसंच पितृपक्षानंतर आपण लोकांच्या मनात असलेला निर्णय घेऊ, असं म्हणत त्यांनी पक्षांतराचे संकेत दिले आहेत. त्यामुळे ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दुसरीकडे, नरहरी झिरवळ यांचा मुलगाही शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे दिसत आहे. नरहरी झिरवळ यांचे सुपुत्र गोकुळ झिरवळ यांनी काही दिवसांपूर्वी जयंत पाटलांची भेट घेतली होती. त्यानंतर आता ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेत सहभागी झाले.
माजी आमदार पप्पु कलानी, ओमी कलानी, पंचम कलानी यांनीही राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेऊन, विधानसभा उमेदवारांबाबत चर्चा केली आहे. तसंच तुतारीवर निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची प्रतिक्रिया ओमी कलानी यांनी दिली.