मुंबई - मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारल्यानंतर पक्षाला मोठा हादरा बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ३८ हून जास्त आमदार असल्याने आता शिवसेना कुणाची? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. मात्र घटनेनुसार, विधिमंडळ पक्ष आणि मूळ पक्ष यात फरक असतो. शिंदे यांचा वेगळा गट असला तरी ते शिवसेना नाव वापरू शकत नाही. त्यांच्या गटाला भाजपा, प्रहार या पक्षात विलीन व्हावं लागेल असं विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीनंतर नीलम गोऱ्हे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, एकनाथ शिंदे यांना न्याय देण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी कायम केला. खुर्चीचा मोह नाही असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ज्यांना जायचं आहे. त्यांनी जा, माझ्याबरोबर काम करायचं त्यांनी करावं असं ते म्हणालेत. आता फुटलेल्या गटाला कुठल्यातरी रजिस्टर पक्षात विलीन व्हावं लागेल. मूळ पक्षाचं शिवसेना हे नाव वापरता येणार नाही. भाजपा किंवा बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेत विलीन व्हावं लागेल. शिवसेना नाव त्यांना मिळणार नाही. चिन्हही मिळणार नाही. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, शिवसेनेची घटना आहे. त्यावर कार्यकारणीचे सदस्य असतात. विधिमंडळ पक्ष आणि मूळ पक्ष वेगळा आहे. धनुष्यबाण चिन्ह मिळवण्यासाठी निवडणुकीत ४-६ टक्के मते मिळवावी लागतात. चिन्ह सहज बदलत नाही. निवडणूक आयोगाकडे ते भूमिका मांडू शकतात. बहुमत आमच्याकडे आहे. कार्यकारणीत एकमत आहे. उद्धव ठाकरे अध्यक्ष आहेत असं त्यांनी सांगितले.
तर चंद्रकांत पाटील, भाजपा प्रदेशाध्यक्ष किंवा बच्चू कडू, प्रहार यांच्या अध्यक्षतेखालील संघटनेत त्यांना काम करावं लागेल. याचा अर्थ शिवसेनेचा भगवा बंडखोर आमदारांनी खांद्यावरून उतरवला आहे. विधिमंडळाची वेगळी प्रक्रिया असते. नियमानुसार पात्र, अपात्र ठरवले जाते. कायद्यानुसार योग्य ती पावले उचलली जातील. अविश्वास प्रस्ताव आणण्याबाबत काही नियम असतात. प्रक्रिया सुरू झाल्यावर पायरीपर्यंत पोहचलं पाहिजे असंही नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
शिवसेनेच्या घटनेत काय आहे?प्रत्येक पक्षाची एक घटना असते. त्याला निवडणूक आयोगाची मान्यता मिळते. शिवसेना पक्षप्रमुख हे महत्त्वाचं पद आहे. २०१८ मध्ये पक्षप्रमुखपदी उद्धव ठाकरे यांची निवड झाली. प्रतिनिधी सभा ही निवड करते. प्रतिनिधी सभेत जिल्हाप्रमुख, विभागप्रमुख असे पदाधिकारी असतात. कार्यकारणीत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, दिवाकर रावते, लीलाधर डाके, रामदास कदम, संजय राऊत, सुधीर जोशी, अनंत गीते, एकनाथ शिंदे, चंद्रकांत खैरे, आनंदराव अडसूळ ही समिती आहे. पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणे शक्य नाही. ही प्रक्रिया खूप विलंब लावणारी आहे.