दापोली - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-भाजपा यांच्यातील वाद चव्हाट्यावर पोहचला आहे. शिवसेना नेते रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांचं काम करणार नाही असा इशाराच भाजपा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. दापोली मतदारसंघात शिवसेना-भाजपा यांच्यात सातत्याने संघर्ष पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच रामदास कदम आणि रवींद्र चव्हाण यांच्यात टोकाचा वाद झाला होता. आता पुन्हा दापोलीत हा संघर्ष पाहायला मिळत आहे.
याबाबत भाजपा जिल्हाध्यक्ष केदार साठे म्हणाले की, दापोली विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण प्रदुषित झालं आहे. हे प्रदुषणमुक्त वातावरण मतदारसंघात निर्माण करणं ही भाजपा कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. त्यानुसार भाजपा कार्यकर्ते वाटचाल करतायेत. सकारात्मक राजकारण करणं म्हणजे भाईगिरीमुक्त वातावरण करणं असा त्याचा अर्थ होतो. युती म्हणून काही बंधने माझ्यावर आहेत. जिल्ह्याचा अध्यक्ष आहे. मधल्या काळात जो काही वादंग मित्रपक्षाच्या माध्यमातून केला गेला. हा त्यांना इशारा आहे हे समजून घ्या. दापोली विधानसभेची संस्कृती जी नव्हती तशी आता परिस्थिती आहे. त्यादृष्टीने भाजपा कार्यकर्ते काम करतायेत. समजने वाले को इशारा काफी है असं त्यांनी सांगितले.
तसेच युती म्हणून भाजपा सकारात्मक आहे. युतीचा उमेदवार इथं जिंकला पाहिजे त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. त्यामुळेच उमेदवार बदलून द्या अशी आमची मागणी वरिष्ठांना केली आहे. लोकसभेत जो तोटा झाला तो भरून काढण्याच्या दृष्टीने वरिष्ठांकडे मागणी केली आहे. महायुतीत ही जागा भाजपाला सोडावी. वरिष्ठपातळीवर हा निर्णय होईल. जर किंवा तर हा विषय नाही. वरिष्ठ नेत्यांना इथल्या परिस्थितीची जाणीव करून दिली आहे. योग्य निर्णय होईल असा विश्वास आहे असं सांगत भाजपा जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी स्पष्टपणे योगेश कदम यांचं काम करणार नसल्याची भूमिका मांडली आहे.
दरम्यान, भाजपाच्या माध्यमातून या मतदारसंघात मंजुर झालेली कामे हे खूप मोठे दुखणे इथल्या विद्यमान आमदारांना आहे. आम्हीही राजकारणात आहोत. पक्ष वाढवायचा आहे. सोयीच्यावेळी महायुती म्हणायचे. भाजपा कार्यकर्त्यांनी विकासकामे मंजूर करून आणायची आणि मीच भूमिपूजन करणार या हट्टापायी इथलं वातावरण गढूळ झाले आहे. दीड वर्षापूर्वी आमदारांसोबत आमची बोलणी झाली, मात्र त्यांना काही समजून घ्यायचं नाही. निव्वळ भाजपा कार्यकर्त्यांनी विकास करायचा नाही, पक्ष वाढवायचा नाही या अटीवर युती होत नाही. आम्ही आमचा पक्ष वाढवणार, तुमचा सन्मान आम्ही करू पण तुम्ही आम्हाला संपवायला निघालात तर असं होत नाही. राजकारण इतकं सोपं नाही असा इशाराच केदार साठे यांनी आमदार योगेश कदम यांना दिला आहे.