मालवण - राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यात संतप्त भावना व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माफी मागितली तर विरोधकांनी या मुद्द्यांवरून महायुती सरकारवर निशाणा साधला. नेमका हा पुतळा कसा कोसळला याची चौकशी करण्यासाठी समिती नेमली गेली आहे. मात्र पुतळा कोसळताना सर्वात आधी पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शीने ती धक्कादायक घटना नेमकी कशी घडली ते सांगितले आहे.
मालवणमधील स्थानिक मच्छिमार असलेले सुनील खंदारे म्हणाले की, दुपारी १.१८ मिनिटांनी वारा आणि पाऊस आला तेव्हा तो पुतळा कोसळला. आम्ही ते डोळ्याने पाहिले. मी बाजारातून येत होतो. त्यानंतर मी घरी येऊन मी कोल्हे साहेबांना फोन लावला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जमिनीवर पडला असं सांगितले. त्यानंतर ते घटनास्थळी आले. आम्हीही तिथे गेलो. अस्थव्यस्थ पुतळा पाहून भावना सोसवत नव्हत्या इतकं जीवाला लागलं. आम्ही ताबडबोड ताडपत्री घेऊन जात तिथे पुतळा झाकून घेतला. त्यानंतर कुडाळहून अधिकारी आले. त्यानंतर बाकी सर्व झालं असं त्यांनी सांगितले.
त्याशिवाय वाऱ्याच्या वेगाने पुतळा कोसळला म्हणण्यापेक्षा तो बसवल्यापासून समतोल नव्हता. त्याचे वजन होते, त्यामुळे खालचे वेल्डिंग मोडून तो पुतळा कोसळला आहे. दररोज आम्ही येता जाता तो पुतळा बघायचो. तो आता दिसत नाही. या घटनेनंतर आपल्या घरातीलच सदस्य गेला अशा भावना आल्या. आमच्या जीवाला खूप लागलं. याठिकाणी मोदींच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण झालं होते. तेव्हापासून पर्यटन वाढले होते. स्थानिकांना काही प्रमाणात रोजगार मिळाला. राजकोटचं परिवर्तन झालं होते. जगाच्या पाठीवर राजकोटचं नाव उमटलं असंही सुनील खंदारे यांनी म्हटलं.
दरम्यान, मालवण समुद्रकिनारी खारे वातावरण असल्याने बाहेर जे लोखंड २ वर्ष टिकते ते इथं ३ महिन्यात गंजून पडणार. लोखंड टिकू शकत नाही. एवढा खर्च करून पुतळा ब्राँझचा बनवला परंतु त्याला सपोर्टला लोखंडाचे वेल्डिंग केले. इलेक्ट्रिक पोल वापरतात ते लोखंड होते. त्यामुळे हे वेल्डिंग ८ महिन्यातच सडून गेले. त्यामुळे पुतळा कोसळला. पुतळ्याचे वरचे वजन किती आणि त्याला खालचा बेस किती असला पाहिजे हे तज्ज्ञांना कळेल. त्यामुळे घाई करून पुतळा बांधला तर पुन्हा असं घडू शकतं. त्यामुळे शासनाने जरी वेळ झाला तरी यावर राजकारण होऊ नये असंही सुनील खंदारे यांनी सांगितले.