नाशिक : राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने वेगवेगळ्या जिल्ह्यातून अटक केलेल्या ‘पीएफआय’च्या ‘त्या’ पाच सदस्यांच्या मोबाईलमधील संभाषणाचा डेटा नष्ट केल्याच्या संशयावरून जळगावातून एकास नाशिक एटीएस पथकाने अटक केली. शनिवारी त्यास जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास चौदा दिवसांची एटीएस कोठडी सुनावली.देशभरात एकाचवेळी सप्टेंबर महिन्याच्या २२ तारखेला पहाटेच्या सुमारास ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या संशयित पदाधिकाऱ्यांची धरपकड करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास करताना आता धागेदोरे थेट जळगावपर्यंत जाऊन पोहाेचले आहेत. एटीएसने जळगावातून सहावा संशयित आरोपी उनैस उमर खय्याम पटेल यास शुक्रवारी अटक करण्यात आली.
‘क्रिएटिव्ह माइन्ड’ नावाचा ग्रुप - पीएफआयचे सहा संशयित जसे एका आंतरराष्ट्रीय व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सक्रिय होते, तसेच ते स्थानिक ‘किएटिव्ह माइन्ड’ या ग्रुपमध्येही सक्रिय होते. - या ग्रुपमध्येदेखील ज्या प्रकारचे संभाषण आढळले आहे, तेसुद्धा आक्षेपार्ह व राष्ट्रीय सुरक्षेला छेद देणारे आहे. - तसेच उनैसच्या संभाषणापैकी दोन संभाषणाची ध्वनिफीत आक्षेपार्ह आहेत.