पुणे/मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी)घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून सांगलीचा प्रमोद चौगुले याने राज्यात प्रथम क्रमांक पटवकला आहे. आयोगाने पात्र विद्यार्थ्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम शुक्रवारी (दि.२९)संपवला आणि त्यानंतर काही तासातच परीक्षेचा निकाल जाहीर केला. आयोगाच्या इतिहासात प्रथमच एवढ्या गतिमानतेने निकाल जाहीर झाला आहे.त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
एमपीएससीतर्फे २०० पदांसाठी २१ मार्च २०२१ रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर पात्र उमेदवारांची मुख्य परीक्षा परीक्षा ४ ते ६ डिसेंबर २०२१ या कालावधीत घेतली गेली. त्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती एप्रिल महिन्यात घेतल्या जात होत्या. शुक्रवारी मुलाखतीचा शेवटचा दिवस होता. मुलाखती झाल्यानंतर अवघ्या काही तासांत आयोगाने अंतिम निकाल जाहीर केला. त्यात प्रमोद चौगुले याने प्रथम, नितेश कदम याने द्वितीय, रुपाली माने हिने तृतीय तर शुभम जाधव आणि अजिंक्य जाधव यांनी अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक पटकवला आहे.
कोरोनामुळे या परीक्षेला विलंंब झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण होते. परंतु, डिसेंबरमध्ये मुख्य परीक्षा झाल्यावर एप्रिल महिन्यात मुलाखती झाल्या. मुलाखतीनंतर तीन-चार महिन्यांनी निकाल जाहीर केला जातो. मात्र,आयोगाने काही तासाच निकाल जाहीर केला. त्यामुळे उमेदवारांना मोठा धक्का बसला. आयोगाच्या संकेतस्थळावर राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला.
एका गुणाने हुकली हाेती संधी
गेल्या राज्यसेवा परीक्षेत माझी एका गुणाने संधी हुकली होती.त्यामुळे पुन्हा जोमाने अभ्यास केल्यावर मला हे यश मिळाले. मी बी.ई.मॅकॅनिकल असून भारत पेटोलियम कंपनीत चार वर्षे काम केले आहे. युपीएससीचीबरोबरच मी एमपीएससीची तयारी करत होतो. माझे वडील टेम्पो चालक असून आई गृहिणी आहे. - प्रमोद चौगुले
मेहुण्यानंतर दाजीची बाजीएमपीएससीच्या मागील राज्यसेवा परीक्षेत प्रसाद चौगुले यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता. यंदा प्रमोद चौगुले यांची प्रथम क्रमांक मिळवला. प्रसाद चौघुले हे प्रमोद चौगुले यांचे मेहुणे आहेत. त्यामुळे मेहुण्यानंतर दाजींनी राज्यात अव्वल क्रमांक पटकवला,अशी चर्चा निकालानंतर रंगलेली दिसून आली.