- सदानंद औंधेलोकमत न्यूज नेटवर्कमिरज (जि.सांगली) : आगामी विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातील विविध पक्षांचे उमेदवार मतदारसंघातील भजनी मंडळांना देण्यासाठी मिरजेतून वाद्ये खरेदी करीत आहेत. यामुळे गणेशोत्सवानंतर विधानसभा निवडणुकीमुळे मिरजेतील वाद्याच्या बाजारात उलाढाल सुरू आहे. इच्छुक उमेदवार एका मंडळासाठी किमान २५ हजार रुपयांचे साहित्य देत असल्याचे चित्र दिसत आहे.धार्मिक कार्यक्रम, सण, उत्सव व गावोगावी भजनी मंडळांसाठी लागणाऱ्या सतार, तंबोरा, तबला, डग्गा, पखवाज, वीणा, हार्मोनियम, ताशा, ढोल, झांज, गिटार संबळ, हलगी, लेझीम, घुमका, झांज, टाळ, मृदंग ही वाद्ये मिरजेतील बाजारात मिळतात.
मराठवाडा आणि विदर्भातही क्रेझ धनगरी ढोल मिरज परिसरात तयार होतात. पंढरपूर, आळंदी, पैठण यांसह अनेक तीर्थक्षेत्रांत मिरजेतून वाद्ये जातात.आता विधानसभा निवडणुकीमुळे विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर व पश्चिम महाराष्ट्रातील विविध पक्षांच्या उमेदवारांकडून मिरजेतील वाद्य विक्रेत्यांकडे वाद्यांची मागणी आहे.यामुळे गणेशोत्सवानंतर निवडणुकीमुळे बाजारात उलाढाल असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
दीडशे वर्षांची परंपरासण उत्सवासाठी लागणारे वाद्य, तंतूवाद्य निर्मितीची दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या मिरजेतील तंतूवाद्यांना देशभरातून मागणी आहे. तंतूवाद्यांसोबतच गणेशोत्सव, नवरात्रोत्सवासाठी वारकरी, भजनी मंडळे, वाद्य पथकांना लागणारी सर्व वाद्ये मिरजेत मिळतात.निवडणुकीच्या तोंडावर मतदारसंघातील गावोगावी भजनी मंडळांना देण्यासाठी वीणा, पखवाज, हार्मोनियम, तबला, डग्गा, संबळ, टाळ, ताशा, झांज ही वाद्ये मिरजेतून खरेदी करण्यात येत आहेत. एका मंडळाला ही वाद्ये देण्यासाठी सुमारे २५ हजार रुपये खर्च आहे. एका मतदारसंघात सुमारे ४० ते ५० मंडळांसाठी वाद्यांना दहा लाखांवर खर्च उमेदवार करीत आहेत. यामुळे वाद्य विक्रेत्यांना अच्छे दिन आले आहेत.
राज्यातील विविध ठिकाणांवरून भजनी मंडळांसाठी मिरजेत वाद्यांच्या बाजारपेठेत मागणी असल्याने पुरवठा करण्याचे काम सुरू आहे. - संजय मिरजकर, वाद्य विक्रेते.