लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाने राज्यातील ४८ पैकी २२ जागांवर दावा सांगितला आहे. लोकसभेच्या २२ जागा या आमच्याच आहेत, त्यामुळे या जागांवर वेगळा दावा करायचा प्रश्नच येत नाही, असे शिंदे गटाच्या खासदारांचे म्हणणे आहे.
२०१९ साली शिवसेना आणि भाजप एकत्र असताना जागावाटप झाले तेव्हा आम्ही २३ तर भाजपने २५ जागा लढवल्या. यापैकी २३ जागांवर भाजपचे आणि १८ जागांवर आमचे खासदार निवडून आले. आगामी लोकसभा निवडणुकीत हेच सूत्र राहील, असा दावाही खासदार कीर्तिकर यांनी केला आहे. तर गटाचे दुसरे खासदार राहुल शेवाळे यांनीही तसे संकेत दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच शिंदे गटाच्या खासदारांची आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतरच शिंदे गटाला २२ जागा हव्या आहेत, हा मुद्दा समोर आला.
कीर्तिकर यांची नाराजी भाजपकडून शिंदे गटाच्या १३ खासदारांना सापत्न वागणूक मिळत असल्याचा आरोप खा. कीर्तिकर यांनी केला. आमचा शिवसेना पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) घटक आहे. त्यामुळे एनडीएचा घटकपक्ष असल्याप्रमाणेच आमची कामे झाली पाहिजेत. पण भाजपकडून खासदारांना सापत्न वागणूक मिळते, असा आरोप कीर्तिकर यांनी केला आहे. हा मुद्दा मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मांडल्याचेही ते म्हणाले.
युतीत कोणतीही अडचण नाही. आम्ही समन्वयाने काम करत आहोत. शिवसेना-भाजप युतीत समन्वयाने संपूर्ण काम होईल, सर्व बाबी ठरल्यानंतर तुम्हाला सांगितले जाईल. - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
मागणीवर भाजपच्या भुवया उंचावल्याइतक्या जागा शिंदे गटाला कशा द्यायच्या, अशी कुजबुज भाजपच्या प्रदेश कार्यालयात शुक्रवारी ऐकायला आली. आता भाजप-शिंदे सेनेतही खटके उडण्याची चिन्हे आहेत.