मुंबई : विधानसभा अध्यक्षांची दीर्घ काळापासून रखडलेली निवड विधिमंडळाच्या ३ मार्चपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात व्हावी, यासाठी पुन्हा एकदा हालचाली सुरू झाल्या आहेत. अर्थसंकल्प ११ मार्चला सादर होण्यापूर्वीच ही निवड होईल, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. या निवडीसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यपालांना पत्र लिहिणार असल्याची माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली.
हिवाळी अधिवेशनात अध्यक्षांची निवड होऊ शकली नव्हती. या निवडीवरून राजभवन विरुद्ध राज्य सरकार असा वादही रंगला होता. गुप्त मतदानाऐवजी आवाजी मतदानाने अध्यक्षांची निवड करणारे विधेयक तर सरकारने सभागृहात मंजूर करून घेतले. निवडीसाठी राज्यपालांची परवानगी घेण्याकरिता मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रस्ताव पाठविला होता. राज्यपालांनी घटनात्मक बाबी तपासून निर्णय देऊ, असे सांगितल्याने सरकार व राजभवनात संघर्षही बघायला मिळाला होता. ३ मार्चपासून अधिवेशन सुरू होत असताना पुन्हा अध्यक्ष निवडीची चर्चा सुरू झाली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याविषयी बुधवारी चर्चा झाली. मुख्यमंत्री ठाकरे हे अध्यक्ष निवडीचा नवा कार्यक्रम राज्यपालांकडे लवकरच पाठवतील व त्यास मंजुरी देण्याची विनंती करतील.
थोरात म्हणाले, यावेळी निवड होण्यात अडचण येणार नाही. ११ मार्चपूर्वी अध्यक्ष निवड होईल. या पदासाठी कोणाला संधी द्यायची, याचा निर्णय काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी घेतील.