मुंबई : टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या गाडीला रविवारी मुंबई-अहमदाबाद हायवेवर अपघात झाला त्यावेळी तिचा वेग ताशी १०० किमी असा होता. अपघाताच्या पाच सेकंदापूर्वी चालक अनाहिता पंडोल यांनी ब्रेक दाबला, असे वाहतूक विभाग आणि मर्सिडिज कंपनी यांच्या प्राथमिक तपास अहवालात नमूद करण्यात आले आहे. हा अहवाल पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे.
मिस्त्री यांच्या कारला रविवारी मुंबई-अहमदाबाद हायवेवर सूर्या नदीच्या पुलावर अपघात झाला. या अपघातात मिस्त्री यांच्यासह दोघे मृत्युमुखी पडले तर चालक अनाहिता पंडोल आणि त्यांचे पती जबर जखमी झाले. अपघात झाला त्यावेळी कारचा वेग १०० किमी प्रतितास असा होता, असे प्राथमिक तपास अहवालात नमूद आहे. हा अहवाल मर्सिडिज कंपनी आणि वाहतूक विभाग यांनी सोपविला आहे. अपघाताच्या पाच सेकंद आधी पंडोल यांनी ब्रेक दाबला, परंतु त्यामुळे गाडीचा वेग ८९ किमी प्रतितास एवढा खाली आला, याच वेगात असताना कारला अपघात झाल्याचे मर्सिडिज कंपनीने म्हटले आहे. दरम्यान, मिस्त्रींच्या अपघातासंदर्भातील कोणताही अहवाल आला नसल्याचे परिवहन विभागाचे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी सांगितले. तसेच सेव्ह लाइफ फाऊंडेशननेही कोणताही अहवाल सादर केलेला नाही.
अपघातग्रस्त गाडी नेणार शोरूममध्ये -- अनाहिता यांनी त्याआधीही ब्रेक दाबला होता का आणि दाबला असल्यास किती वेळा, असा प्रश्न पालघर पोलिसांनी मर्सिडिज कंपनीला विचारला. याबद्दलच्या अधिक माहितीसाठी कंपनी १२ सप्टेंबरला अपघातग्रस्त कार शोरूममध्ये नेणार आहे. - तिथे हाँगकाँगहून कंपनीची एक टीम येईल. ती कारचे निरीक्षण करेल. यानंतर सविस्तर अहवाल देण्यात येणार आहे. हाँगकाँगहून येणाऱ्या टीमने भारताच्या व्हिसासाठी अर्ज केला आहे. मात्र, ४८ तासांत व्हिसा न मिळाल्यास भारतात असलेली मर्सिडिज कंपनीची टीमच कारचे निरीक्षण करणार आहे.
चार एअरबॅग्ज उघडल्या -कारला अपघात झाला त्यावेळी चार एअरबॅग्ज उघडल्या होत्या. यापैकी तीन एअरबॅग्ज चालकाच्या समोर आणि एक डोक्याजवळ उघडली. तर एक एअरबॅग चालकाच्या शेजारच्या सीटसमोर उघडली असे वाहतूक विभागाने अहवालात नमूद केले आहे.
पंडोल दाम्पत्याची प्रकृती स्थिर -मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात जबर जखमी झालेल्या डॉ. अनाहिता पंडोल आणि त्यांचे पती डॅरियस पंडोल यांची प्रकृती स्थिर असल्याचे गिरगाव येथील सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयातर्फे सांगण्यात आले.
गुरुवारी डॅरियस पंडोल यांच्या मनगटावर एक छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली असून, अनाहिता यांना वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
विविध विषयातील २० तज्ज्ञ डॉक्टरांची टीम पंडोल दाम्पत्यावर उपचार करीत असून, त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. रुग्णालयातर्फे त्यांच्या उपचाराकरिता सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.