मुंबई : औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव हे नामांतर करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. हा निर्णय केंद्र सरकारने घेतला पाहिजे. एवढी वर्ष केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना तुम्हाला हे का सुचले नाही? आजचा दिवस यासाठी का निवडला? असे थेट सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहेत.ज्या ठिकाणी उच्च न्यायालय, विमानतळ, विभागीय कार्यालय, रेल्वे, मुख्य पोस्ट ऑफिस अशी महत्त्वाची कार्यालये असतात. अशा शहरांची नावे केंद्र सरकारच बदलू शकते. तो अधिकार राज्य सरकारांना नाही. आजपर्यंत जेवढी नावे बदलली गेली ती केंद्र सरकारकडून बदलली गेली. बॉम्बेचे मुंबई यावर शिक्कामोर्तब केंद्र सरकारने केले. मद्रासचे चेन्नई, अलाहाबादचे प्रयागराज ही नावे देखील केंद्र सरकारने बदलली. राज्य सरकारला आजच हा निर्णय का घ्यावा वाटला? मुळात आजचा हा निर्णय नसून हा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवावा लागेल. त्यावर केंद्र सरकार निर्णय घेईल. मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहता असा निर्णय घेण्यामागचा हेतू कोणापासूनही लपू शकत नाही, असेही राज ठाकरे म्हणाले. अडीच वर्ष महाराष्ट्रात सरकार असताना या सरकारला हा निर्णय या कालावधीत का घ्यावा वाटला नाही? तसा प्रस्ताव करून त्यांनी केंद्र सरकारला का पाठवला नाही? मुळात जे काम आपले नाहीच, ते काम आपण केले असे सांगण्यात काय हशील आहे, अशा शब्दात राज ठाकरे यांनी आजच्या निर्णयावर टीका केली.
नामांतराचा अधिकार राज्य सरकारला नाही, एवढी वर्षे काय केले, राज ठाकरेंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 10:54 AM