पुणे - ज्या वस्ताद लहुजी साळवे यांनी थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांना संरक्षण दिले. साळवे यांनी गावोगावी कुस्ती सुरू केली. अनेक तरुणांना कुस्तीकडे आकर्षित केले. मात्र यापूर्वीच्या राज्य सरकारने कधीही लहुजी साळवे यांचा सन्मान केला नाही किंवा त्यांच्या नावावर एखादी योजना सुरू केली नाही अशी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.
गोपीचंद पडळकर म्हणाले की, मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन वस्ताद लहुजी साळवे यांच्या नावाने राज्यात कुस्तीस्पर्धेचे आयोजन केले पाहिजे आणि यासाठी लागणारा जो काही निधी आहे तो शासनाने दिला पाहिजे अशी मागणी करणार आहे. मी त्याबाबत लवकर उपमुख्यमंत्री फडवणीस यांची भेट घेईन आणि याबाबत त्वरीत पावले उचलण्याची विनंती करेन असंही पडळकरांनी सांगितले.
ज्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी समाजाला दिशा देण्याचं काम केले. या फुले दाम्पत्यांवर तीव्र टीका आणि शारिरीक हल्ले झाले. यातून फुले दाम्पत्यांना संरक्षण देण्यासाठी लहुजी पुढे सरसावले. त्यांनी या हल्ल्यापासून संरक्षण देत फुले दाम्पत्यांच्या पाठिशी उभे राहिले. फुले यांच्या समाज सुधारणेच्या कार्यात लहुजी साळवे यांनी मदत केली. फुले यांनी लहुजी यांच्या समाजकार्याबद्दल कौतुक केले होते असंही पडळकर यांनी म्हटलं.