मुंबई- आमच्या सगळ्या भावंडाचे शिक्षण बारामतीतील बालविकास मंदिरला झाले. विशेषत: आम्ही ४ भावंडे आणि मोठी बहीण रजू आक्का आम्ही तिथे एकत्र होतो. रजू आक्काचे वडील लवकर गेल्याने आमच्या मोठ्या काकी याच आमचे शिक्षण, राहण्याची, जेवणाची सोय केली होती. प्राथमिक शिक्षण आमच्या सगळ्यांचे तिथेच झाले. त्यानंतर MES हायस्कूलमध्ये आमचे पुढचे शिक्षण झाले असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलं.
अजित पवार म्हणाले की, MES संस्थेत आमच्या आधीच्या पिढीचं आणि आमचे शिक्षण झाले. शिक्षणाबाबत आजोळाचा संबंध नाही. आमचे शिक्षण बारामतीत झाले. दहावीला मला गिरगावातील विल्सन हायस्कूलला प्रवेश घेण्यात आला. परंतु दुर्दैवाने दहावीत मी एका विषयात नापास झालो. काका-काकी मुंबईला होते, त्यांनी अजितला मुंबईत नेतो की आजीने सांगितले याला घेऊन जा हे आता माहिती नाही. पण मी दहावीला मुंबईत आलो. मला मुंबई मानवली नाही. त्यामुळे अपयश आले. नापास झाल्याने पुन्हा मला जावे लागले. त्यानंतर पुढच्या वर्षी मी तो विषय सोडवला असं त्यांनी म्हटलं.
त्याचसोबत माझ्यासोबतची बॅच पुढे निघून गेल्यानंतर मन अस्वस्थ झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी कोल्हापूरला गेलो. शहाजी कॉलेजला प्रवेश घेतला. आमच्या घरात मोठी बहीण रजू आक्का ही अतिशय हुशार आहे. ती डॉक्टर झाली. सगळ्यात मोठे काका वसंतराव पवारांची मुलगी ती डॉक्टर झाली. माझी मोठी बहीण विजया पाटील हीदेखील हुशार होती. आमच्या ४ भावंडात हुशार होती. आम्ही कधी कधी लहानपणी झोपल्यानंतर तिच्या डोक्याला डोकं लावून झोपायचो. मला एकदा विचारले असे का करतोय, तेव्हा तिची बुद्धी थोडी आपल्यातपण येऊ दे असा किस्सा अजित पवारांनी ऐकवला.
दरम्यान, सुप्रिया त्यातल्या त्यात बरी होती. सुप्रियाने गॅप घेतला नाही. मी गॅप घेतला. आमचे मोठे बंधू राजेंद्र पवार त्यांनी गॅप घेतला. माझी डिग्री बी.कॉम आहे. पण मी डिग्री पूर्ण घेतली नाही. एक सेमिस्टर राहिल्याने SYBCOM लिहिता येत नाही. मी माझा फॉर्म भरताना B.com असो वा पदवीधर म्हणून कधीच लावत नाही असा खुलासाही अजित पवारांनी केला. ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांना दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.