मुंबई :
एप्रिलच्या तारखा जसजशा पुढे सरकत आहेत, तसतसे मुंबईसह राज्यात उन्हाचा जोर आणखी वाढतच असून, आता तर पुढील चार दिवस हवामानात उल्लेखनीय बदल होणार आहेत. हवामान खात्याकडील माहितीनुसार, १० ते १२ एप्रिलदरम्यान विदर्भात उष्णतेची लाट येणार असून, मध्य महाराष्ट्रासह कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे मुंबईचा पारादेखील चढाच असून, कमाल तापमान ३४ अंशावर स्थिर आहे. परिणामी वाढत्या उन्हासह उकाड्यातदेखील कमालीची वाढ झाली असून, नागरिक अक्षरश: होरपळून निघत आहेत.
भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. उर्वरित राज्यात हवामान कोरडे होते. विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले. पुढील चार दिवसांसाठी राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, विदर्भ, बिहार आणि झारखंड या राज्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढराज्यातील उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून, ही संख्या ९२ झाली आहे. आतापर्यंत ८ मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात २०२० - २०२१ या वर्षात उष्माघाताने ४३ जणांचा बळी घेतला होता. त्यापूर्वी २०१६ साली १९, २०१७ साली १३ आणि २०१८ मध्ये दोन मृत्यूची नोंद झाली होती. मात्र, येत्या काळात राज्यात पुन्हा उष्णतेच्या लाटांचा इशारा असल्याने काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
उष्माघात म्हणजे वातावरणातील तापमान खूप वाढल्यावर शरीरातील पाणी कमी होऊन उद्भवणारा गंभीर आजार. शरीरातील पाणी जसजसे कमी होते, तसतसे वेगवेगळे परिणाम यात दिसून येतात. त्यानुसार याचे काही उपप्रकार पडतात. पण, याला सरसकटपणे उष्माघात असेच म्हटले जाते. शरीराचे अंतर्गत तापमान मेंदूतील हायपोथॅलॅमस नावाच्या भागाद्वारे होते. थंडीमध्ये हायपोथॅलॅमसकडून जाणाऱ्या संदेशामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, त्वचेची घर्मरंध्रे बंद होतात, परिणामी कुडकुडणे सुरू होते आणि शरीरातील उष्णता कायम राखली जाते. याउलट उन्हाळ्यात वातावरणाचे तापमान वाढल्यावर शरीराचे बाह्य तापमानही वाढते. बाह्य उष्णतेमुळे शरीरातील पाणी कमी होण्याच्या क्रियेला ‘हीट स्ट्रेस’ किंवा उष्णता तणाव म्हणतात, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली.
कुठे येईल लाट?९ ते १२ एप्रिल : झारखंड, बिहार१० ते १२ एप्रिल : विदर्भ
९ एप्रिलकोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील. १० एप्रिलकोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहील. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल.११ आणि १२ एप्रिलकोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहील. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल.