काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाच्या मुख्यमंत्री पदावरील दाव्यांच्या पत्रकार परिषदेनंतर आता अजित पवारांचे महत्वाचे वक्तव्य आले आहे. उद्या मी , फडणवीस, शिंदे आणि दिल्लीला जाणार आहोत, दिल्लीला गेल्यानंतर आमची पुढची चर्चा होणार आहे. त्यानंतर दोन उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री असे सरकार स्थापन होईल, असे पवार म्हणाले.
नव्या सरकारचा शपथविधी महिन्याच्या शेवटी तीस तारखेपर्यंत व्हायला पाहिजे. आम्ही आणि आमचा पक्ष, आमदार, कार्यकर्ते थांबलेले आहेत. बाकीच्यांनी फुकटचा सल्ला द्यायची गरज नाही, असे रोहित पवारांच्या अजित दादांना मुख्यमंत्री करावे या मागणीवर अजित पवार म्हणाले.
तसेच कार्यकर्त्यांना काही जरी वाटत असले तरी प्रत्येकाची संख्या किती आली? किती लोक निवडून आले हे पाहिले जाते. मागच्या अडीच वर्षांपूर्वीची गोष्ट वेगळी होती आत्ताची परिस्थिती वेगळी आहे, असेही पवार यांनी सांगितले.
निकाल लागून तीन दिवस झाले अजून कशातच काही नाही. माझ्या संपर्कात शरद पवार गटाचा कोणीही नाही. निवडून आलेल्या आमदारांची आम्ही बैठक घेतली. त्यात आमच्या पराभूत आमदारांचा देखील समावेश होता. त्यांचे मन जाणून घेतले आहे. तसेच निवडून आलेल्या आमदारांना मतदार संघात जाऊन जनतेच्या आभार मानायला सांगितल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
एकनाथ शिंदे यांनी काय करावे, त्यांच्या वाट्याला किती जागा येतील, किती पदे येतील त्याबाबत सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांना आहे. आमच्या बाजूचा निर्णय आम्ही घेऊ त्यांच्या बाबतीचा निर्णय मी कसा सांगणार? असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.