मुंबई - राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपतींनी थेट राजकारणात उतरणार असल्याचं जाहीर केले. सुरुवातीला संभाजीराजेंनी स्वराज्य या संघटनेची स्थापना केली. त्यानंतर अपक्ष म्हणून निवडणुकीत उभे राहणार सांगितले. परंतु आवश्यक पाठबळ न मिळाल्याने संभाजीराजेंनी निवडणुकीतून माघार घेत स्वराज्य संघटना महाराष्ट्रात बळकट करणार असल्याचं म्हटलं.
आता संभाजीराजेंनी स्वराज्य संघटना बळकट करण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकलं आहे. संभाजीराजे म्हणाले की, स्वराज्यचे बोधचिन्ह सर्वांच्या कल्पनेतून साकारावे. विस्थापित मावळ्यांना संघटीत करून जनतेच्या मनातलं 'स्वराज्य' आणण्यासाठी "स्वराज्य" संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. या संघटनेचे अधिकृत बोधचिन्ह (लोगो) जनतेच्याच संकल्पनेतून साकारावे, अशी आमची इच्छा आहे. हे बोधचिन्ह सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधित्व करणारे असे स्वराज्य संघटनेची ओळख असेल तरी कल्पक मंडळींनी बोधचिन्ह तयार करून आमच्याकडे पाठवावे असं आवाहन त्यांनी केले आहे.
कसं असावं बोधचिन्ह?• बोधचिन्ह हे लक्षवेधी व संस्मरणीय असावे. ते फार क्लिष्ट असू नये.• बोधचिन्ह हे रेडियम प्रिंट, ग्राफिक प्रिंट अशा कोणत्याही स्वरूपात वापरण्यास सोयीस्कर असावे.• एकदा बोधचिन्ह स्वीकृत केल्यानंतर त्यावर पूर्ण अधिकार हा स्वराज्य संघटनेचा असेल. • एखाद्या बोधचिन्हाची संकल्पना आवडल्यास ते स्वीकृत केल्यानंतर, त्यामध्ये कोणतेही बदल करण्याचे अधिकार स्वराज्य संघटनेकडे असतील. • कृपया जास्तीत जास्त सोमवार, दि. २० जून पर्यंत बोधचिन्ह पाठवून सहकार्य करावे.
ज्यांनी तयार केलेले बोधचिन्ह 'स्वराज्य'चे अधिकृत बोधचिन्ह म्हणून स्वीकारले जाईल, त्यांस छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते मानपत्र व मानचिन्ह देऊन सन्मानित केले जाईल. बोधचिन्ह पाठविण्यासाठी तात्पुरता व्हॉट्स ॲप नंबर 9403788699 देण्यात आला आहे. लोकांना संघटीत करण्यासाठी, समाजाला एक वेगळी दिशा देण्यासाठी आणि गोरगरीबांचं कल्याण कऱण्यासाठी मी एक संघटना स्थापन करत आहे. या संघटनेचं नाव 'स्वराज्य' असं आहे. या महिन्यातच लोकांची भावना समजून घेण्यासाठी राज्याचा दौरा करणार आहे" असं संभाजीराजेंनी गेल्या महिन्यात म्हटलं होतं.