राष्ट्रवादीच्या फुटीनंतर बारामतीतील पवार कुटुंबीयांची ही पहिलीच दिवाळी आहे. दिवाळीच्या दोन कार्यक्रमांना अजित पवारांनी संपूर्ण पवार कुटुंबाच्या कार्यक्रमांना हजेरी लावली होती. परंतू, आजचा बारामतीतील कार्यक्रम हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी असतो. दिवाळी पाडव्याच्या दिवशी सर्व कार्यकर्ते गोविंदबागेत दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी जमतात. या कार्यक्रमाला अजित पवार येणार की नाहीत, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
चार दिवसांपूर्वी पुण्यात दुसऱ्या काकांच्या घरी आणि काल सख्ख्या भावाच्या घरी आयोजित कार्यक्रमात अजित पवार सहकुटुंब सहभागी झाले होते. सुप्रिया सुळेंनी ट्विटरवर टाकलेल्या फोटोत जरी ते नसले तरी अजित पवार तिथे हजर होते. यामुळे इतरही कार्यक्रमांना अजित पवार हजेरी लावतील अशी अपेक्षा कार्यकर्ते करत होते. यावर सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केले आहे.
आज दिवाळी पाडवा सर्वत्र साजरा होत आहे. पवार कुटुंबियांना शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे शरद पवार यांच्या निवासस्थान असलेल्या गोविंद बागेत येत असतात या ठिकाणी सकाळपासूनच कार्यकर्त्यांची गर्दी झाली आहे. मात्र या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार रोहित पवार आज गैरहजर आहेत.
महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याचबरोबर आज महाराष्ट्रामध्ये महागाई बेरोजगारी यातून आपली मुक्तता व्हावी अशीच या निमित्ताने प्रार्थना करते. आज रोहित पवार हे बीडमध्ये संघर्ष यात्रा करीत आहेत त्यांचे मी मनापासून कौतुक करते. महाराष्ट्राच्या नवीन पिढीसाठी रोहित पवार हे संघर्ष करतात त्याचा मला अभिमान आहे. रोहित पवार यांनी जनतेला शब्द दिला होता, त्यानुसार त्यांनी संघर्ष यात्रा काढलेली आहे. अजित दादांना डेंग्यू झाल्याने ते या ठिकाणी उपस्थित नाहीत. जी गोष्ट आहे ती मोठ्या मनाने स्वीकारली पाहिजे. अर्धा ग्लास हा नेहमी अर्धाच असतो तो रिकामा नसतो, देवाने मला आयुष्यात खूप गोष्टी शिकवल्या आणि यातून मी फार काही शिकले आहे, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.