मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात स्वाईन फ्लूचा धोका वाढत आहे. राज्यात सध्या एक हजार १७५ रुग्ण उपचाराधीन असून, ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सर्वाधिक रुग्ण पुणे आणि मुंबईत आहेत. गेल्या ११ दिवसांत १७ रुग्णांनी जीव गमावला आहे. पुण्यात स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या २२३ वर पोहोचली आहे.
पुण्यात आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर रायगड, ठाणे आणि कल्याणमध्येही प्रत्येकी एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याखालोखाल ठाण्यात २२३, मुंबईत २२१ रुग्ण आहेत. मुंबईत ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ८० रुग्णांचे निदान झाले आहे.
अकोला आणि औरंगाबादमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. गेल्या आठवड्यात पुण्यात साताऱ्याहून उपचारांसाठी आलेल्या तीन रुग्णांचा मृत्यू झाला. रत्नागिरीहून कोल्हापुरात उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. चंद्रपुरातील एका नागरिकाचा नागपुरात मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.