मुंबई - राज्यात गेल्या काही दिवसांपासून झिका आजाराचे रुग्ण वाढत असून, आतापर्यंत १२८ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत अजून एकही रुग्ण सापडलेला नसला, तरी सार्वजनिक आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. झिका हा डेंग्यू आणि चिकुनगुनियासारख्या एडिस डासांमुळे पसरणारा आजार आहे. हा आजार प्राणघातक नसला, तरी ‘झिका’ची लागण झालेल्या गर्भवती महिलांना त्याचा अधिक धोका असतो. त्यामुळे नवजात अर्भकाच्या मेंदूचा आकार लहान होऊ शकतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.
झिका आजाराचे पुणे महापालिका हद्दीत ९९, पुणे ग्रामीणमध्ये ९, पिंपरी-चिंचवड पालिका हद्दीत ६, अहमदनगर (संगमनेर) मध्ये ११, सांगली (मिरज) मध्ये १, कोल्हापूरमध्ये १, सोलापूरमध्ये १ या ठिकाणी रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काही मार्गदर्शक सूचना सर्व राज्यांसाठी जारी केल्या आहेत. या आजारामुळे कुणीही घाबरून जाण्याची गरज नाही.
या आजारात रुग्णाला उपचारासाठी भरती व्हावे लागत नाही. तसेच, मृत्यूचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. ताप आल्यास त्वरित सरकारी रुग्णालयात दाखवावे. अंगावर ताप काढू नये. कोणत्याही परिस्थितीत डासांची पोषक वातावरण तयार करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
उपचार काय?रुग्णाने पुरेशी विश्रांती घ्यावी.निर्जलीकरण टाळण्यासाठी पुरेशा प्रमाणात द्रव पदार्थांचे सेवन करावे.ऑस्पिरीन अथवा एन.एस.ए.आय.डी. प्रकारातील औषधांचा वापर करू नये.
झिकाचे निदान कुठे होते? राष्ट्रीय रोगनिदान संस्था, नवी दिल्ली तसेच राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणे तसेच व्हीआरडीएल प्रयोगशाळा नागपूर, मिरज, सोलापूर, अकोला व छत्रपती संभाजीनगर येथे ‘झिका’च्या निदानाची सुविधा मोफत उपलब्ध आहे.
प्रसार कशामुळे होतो?
लैंगिक संपर्काद्वारे. गर्भधारणेदरम्यान. आईपासून गर्भापर्यंत संक्रमित होतो.रक्त आणि रक्त उत्पादनांचे संक्रमण.अवयव प्रत्यारोपणाद्वारे.