Maharashtra Kesari 2025 : कर्जत येथील महाराष्ट् केसरीच्या सेमी फायनलमध्ये माती विभागातून वेताळ शेळके, प्रशांत जगताप, तर गादी विभागातून शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज पाटील यांनी बाजी मारली. महाराष्ट्र केसरी किताबासाठी आज रविवारी हे चारही मल्ल झुंजणार आहेत. त्यांच्यातूनच विजेता ठरणार आहे.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शनिवारी संध्याकाळी महाराष्ट्र केसरी किताबसाठी सेमी फायनलच्या कुस्त्या रंगल्या. माती विभागात सोलापूरच्या वेताळ शेळके आणि सांगलीच्या सनी मदने यांच्यात सेमी फायनलची प्रथम कुस्ती रंगली. यात सोलापूरच्या वेताळ शेळकेने ११ गुण मिळवत अवघ्या एकाच मिनिटात सनी मदनेवर बाजी मारली. पाटील याला एकही गुण मिळवता आला नाही. तर दुसऱ्या उपांत्य लढतीत नांदेडचा अनिल जाधव आणि अकोल्याचा प्रशांत जगताप यांच्यात रोमांचक लढत पाहावयास मिळाली. मात्र, अखेरच्या क्षणी प्रशांत जगताप याने आक्रमक खेळ करीत १२ गुण प्राप्त करत अनिल जाधववर विजय मिळवत अंतिम लढतीत स्थान मिळविले. अनिल जाधव यास ५ गुण मिळवण्यात यश आले. गादी विभागात नांदेडच्या शिवराज राक्षे आणि कोल्हापूरचा संग्राम पाटील यांच्यात सेमी फायनलची कुस्ती रंगली. यात शिवराज राक्षेने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करीत ११ गुण मिळवत बाजी मारली. संग्राम पाटीललाही उपांत्य कुस्तीत एकही गुण मिळविता आला नाही. तर दुसऱ्या कुस्तीमध्ये मुंबईच्या पृथ्वीराज पाटील विरुद्ध सोलापूरच्या शुभम माने यांच्यात झाली. यामध्ये पृथ्वीराज पाटील याने बाजी मारली. पाटील याने सुरुवातीपासूनच माने याच्यावर पकड घेत ११ गुण प्राप्त करीत विजय मिळविला. शुभम मानेलाही एकही गुण मिळविता आला नाही.
सेमी फायनल कुस्ती मैदानासाठी शनिवारी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार, वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांची उपस्थिती होती. त्यांनी माती विभागातील वेताळ शेळके आणि सनी मदने यांची कुस्ती लावली. यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे पदाधिकारी, कर्जत-जामखेडचे राजकीय पदाधिकारी यांच्यासह आजी-माजी मल्ल उपस्थित होते. या चारही कुस्तीत प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत प्रोत्साहन दिले.
अंतिम सामन्याला शरद पवार राहणार उपस्थितरविवारी महाराष्ट्र केसरीसाठी माती विभागात सोलापूरचा वेताळ शेळके आणि अकोल्याचा प्रशांत जगताप यांच्यात लढत होईल. तर गादी विभागात नांदेडचा शिवराज राक्षे आणि मुंबईचा पृथ्वीराज पाटील यांच्यात कुस्ती रंगणार आहे. या दोन्ही विभागांतील विजेते मल्ल फायनलमध्ये ६६ व्या महाराष्ट्र केसरी किताबसाठी अंतिम सामन्यात एकमेकांसमोर भिडतील. अंतिम सामन्यास ज्येष्ठ नेते शरद पवार उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते विजेत्या मल्लास बक्षीस वितरण करण्यात येईल.