लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यात दिवसेंदिवस ट्रॅव्हल्सचे अपघात वाढले आहेत, परंतु अपघात घडल्यानंतर ट्रॅव्हल्स चालकावर कारवाई होते, पण ट्रॅव्हल्स कंपन्या अनेकदा नामानिराळे राहतात, पण आता त्या कंपन्याही वेसण घातली जाणार आहे. ट्रॅव्हल्स चालविताना कंपनी सर्व लाभ घेते, पण अपघात घडल्यास जबाबदारी नाकारली जाते. त्या कंपनीची जबाबदारी निश्चित करा, असा प्रस्ताव परिवहन विभागाने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाकडे पाठविला आहे.
राज्यात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. साडेतीन कोटींहून अधिक वाहने असून अपघात आणि अपघाती मृत्यूही वाढत आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरपर्यंत ३० हजार ८५७ रस्ते अपघातात १३,५७९ जणांचा मृत्यू झाला, तर १३,५७९ जखमी झाले होते.
अपघाताची प्रमुख कारणे
- चालकाला थकवा असताना बस चालविणे
- बसमध्ये तांत्रिक बिघाड
- भरधाव वेगाने वाहन चालविणे
- मद्यपान करून वाहन चालविणे
- मोबाइलचा वापर करणे
बस अपघातात चालकासोबत संबंधित कंपनी लाभ घेते, पण अपघाताची जबाबदारी घेत नाही. या कंपनीची जबाबदारी निश्चित करा, असा प्रस्ताव परिवहन विभागाने तीन महिन्यांपूर्वी रस्ते परिवहन मंत्रालयाला पाठविला आहे. - विवेक भिमनवार, परिवहन आयुक्त.
बस अपघातात बस कंपनी जबाबदारी निश्चित करणे स्वागतार्ह्य निर्णय आहे. कित्येक वेळा बस चालकाला थकवा आला असताना, त्याला जास्त पैसे देऊन बस चालविण्यास भाग पाडले जाते. काही बस नादुरुस्त असताना चालविल्या जातात. त्यामुळे बस अपघात होऊन प्रवाशांचा जीव जातो. - डॉ. शंकर विश्वनाथ, वाहतूक तज्ज्ञ.