स्वत:च्या पक्षाची मते नसली तरी अनेकदा विधान परिषद आमदार राहिलेल्या शेकापच्या जयंत पाटील यांना कालच्या निवडणुकीत मोठा धक्का बसला. उद्धव ठाकरेंनी उमेदवार दिला नसता तर निवडणूक बिनविरोध झाली असती, परंतू पाटील यांनी रायगडमध्ये लोकसभेला तटकरेंना केलेली मदत भोवल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात असताना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी मोठा दावा केला आहे.
उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे गटाचीही मते फुटल्याचा खळबळजनक दावा केला आहे. विधान परिषद निवडणुकीत केवळ काँग्रेसचीच नाहीत तर ठाकरे गटाचीही मते फुटली. मिलिंद नार्वेकरांच्या मागे अदृष्य हात होते, असा दावा सामंत यांनी केला आहे. ज्या आमदारांनी आम्हाला मदत केली त्यांच्याबाबत लवकरच वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाईल असेही सामंत म्हणाले.
काँग्रेसच्या नेतृत्वावर काँग्रेसच्या आमदारांचा विश्वास नाही. उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांचा उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास नाही . शरद पवार गटाच्या आमदारांचा शरद पवार यांच्यावर विश्वास नाही. स्वतःहून 22 ते 23 आमदारांनी महायुतीला मतदान केले. भाजपचा आकडा 105 वरून 118 वर गेला, शिंदे साहेबांचा आकडा पाच मी वाढला. अजित पवारांचा आकडा चारने वाढला आहे. पहिल्याच फेरीत आठ उमेदवार निवडून आले, असा दावा सामंत यांनी केला. तसेच उद्धव ठाकरे गटाची मते १६ होती त्यांच्यामध्ये पाच मते वाढली. ही अदृश्य ताकद कोण आहे ज्यांनी नार्वेकर यांना सोळा वरून 22 वरती नेले, असेही सामंत म्हणाले.
ठाकरे गटाची मते फुटली तर मग नार्वेकरांना कोणाची मते मिळाली? नार्वेकरांच्या मागे कोणाचे हात होते याबाबत दोन दिवसांत मी माहिती घेईन असेही सामंत म्हणाले. मविआ कशाप्रकारे छोट्या पक्षांना संपविते याचे उत्तम उदाहरण कपिल पाटील आणि जयंत पाटील आहेत अशी टीकाही सामंत यांनी केली. आम्ही आमच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवून पैशांची उधळपट्टी केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. त्यांनीही त्यांचे आमदार हॉटेलमध्ये ठेवले होते. आमच्यावर आरोप करता मग तुम्ही काय केले, असा सवालही सामंत यांनी उपस्थित केला.
अशी फुटली मते...महाविकास आघाडीकडे ६९ मते होती. यात काँग्रेस - ३७, उद्धव सेना - १५, शरद पवार गट - १२, शेकाप - १, समाजवादी पार्टी २, माकप - १ आणि अपक्ष १ यांचा समावेश होता. मात्र मविआच्या रिंगणात असलेल्या प्रज्ञा सातव (काँग्रेस), मिलिंद नार्वेकर (उद्धव सेना) व जयंत पाटील (शेकाप) या तीन उमेदवारांना पहिल्या पसंतीची ५९ तर काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांना २५ मते मिळाली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसने सातव यांना पहिल्या पसंतीची २८ मते देण्याचे निश्चित केले होते. म्हणजे सातव यांना मतदान करण्यास सांगण्यात आलेल्या काँग्रेसच्या २८ आमदारांपैकी ३ आमदारांनी त्यांना मतदान न करता महायुतीच्या उमेदवाराला मतदान केल्याचे स्पष्ट आहे.