लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: कोरोना महामारी आणि त्या पाठोपाठ सहा महिने कर्मचाऱ्यांचा चाललेला दीर्घकालीन संप यामुळे एसटी महामंडळ आर्थिकदृष्ट्या डबघाईला आले होते. एसटी बंद पडते की काय? अशी अवस्था होती. मात्र त्यानंतर एसटीने लागू केलेल्या विविध उपाय योजनांमुळे जुलै महिन्यात ३१ पैकी १८ विभागांनी नफा कमवला आहे.
या महिन्यात एसटी महामंडळाचा तोटा २२ कोटी झाला आहे. यंदा एप्रिल ते जुलैमध्ये मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत १३१ कोटी रुपयांनी तोटा कमी झाला आहे. गेली पाच-सहा वर्ष अनेक आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळाला भविष्यात सुगीचे दिवस येतील, अशा रितीने एसटीची आर्थिक घोडदौड सुरू आहे. कोरोनानंतर मे २०२२ पासून एसटीची सुरळीत वाहतूक सेवा सुरू झाली.
एसटीचा घटलेला प्रवासी पुन्हा एसटीकडे वळविणे हे मोठे आव्हान होते. यावेळी ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास व सर्व महिलांना एसटीच्या प्रवासी तिकिटात ५० टक्के सवलत या दोन योजना सुरू झाल्या. ज्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ झाली. सध्या ५३ लाख प्रवासी एसटीतून दररोज प्रवास करत आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. माधव कुसेकर यांनी दिली.
तोट्यातल्या फेऱ्या बंद
जे विभाग गेली कित्येक वर्ष तोट्यात आहेत, त्या विभागांना मार्गदर्शन करण्यासाठी मध्यवर्ती कार्यालयाकडून पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली गेली. स्थानिक पातळीवर आगारनिहाय कर्मचारी व अधिकारी यांच्या बैठका घेण्यात आल्या. तोट्याच्या मार्गावरील बस फेऱ्या बंद करून, त्या ज्या मार्गावर प्रवासी जास्त आहेत तेथे वळविण्यात आल्या.