नवी मुंबई - उद्धव ठाकरेंशी फारकत घेत एकनाथ शिंदे यांनी भाजपाशी हातमिळवणी केली. बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी विचार आम्ही पुढे घेऊन जात असल्याचं सांगत शिंदेंनी शिवसेनेवर दावा केला. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेला शिवसेनेचे ४० आमदार आणि १२ खासदार यांनी पाठिंबा दिला. त्याचसोबत पक्षातील विविध पदाधिकारी, कार्यकर्तेही शिंदे गटात सहभागी झाले. मात्र नवी मुंबईच्या एका माजी नगरसेवकाने शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत.
माजी नगरसेवक एम. के मढवी म्हणाले की, मागील २ महिन्यापासून शिंदे गटाकडून माझ्यावर त्यांच्यासोबत येण्यासाठी दबाव टाकला आहे. माझ्यावर तडीपारीची कारवाई करण्याची नोटीस देत कुटुंबापासून दूर करण्याचा डाव आखला आहे. नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी मला शिंदे गटात सहभागी व्हा अन्यथा तुमचा एन्काऊंटर करू अशी धमकी देत १० लाख रुपये देण्याची मागणी केली. या प्रसंगामुळे माझ्यावर मानसिक दडपण आले आहे असं त्यांनी म्हटलं.
तसेच मला, माझ्या कुटुंबाला धोका आहे. शिंदे गटात सहभागी झाले नाही तर एन्काऊंटर करण्याची धमकी दिली. माझ्यावर खोटे आरोप आणि खोट्या केसेस करून तडीपार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जर माझ्यावर अशी कारवाई होत असेल तर मी, माझं कुटुंब, साडेतीन वर्षाची नात, २ मुले, सुन, पत्नीसह आत्महत्या करू. आमच्या जीवाला कमी जास्त झालं तर त्याला जबाबदार विवेक पानसरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संदीप नाईक, विजय चौगुले जबाबदार असतील असा इशारा एम. के मढवी यांनी दिला आहे.
कुटुंबावर आत्महत्या करण्याची वेळ ही गंभीर बाब - राजन विचारे४० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. जनता सध्या हवालदिल झालीय. २ महिन्यापासून शिंदे गटात जर कुणी गेले नाही तर त्यांच्या झुणका भाकर केंद्रावर कारवाई केली जाते. रविवारच्या दिवशी अतिक्रमण कारवाई झाली. संपूर्ण महाराष्ट्रात या गोष्टी सुरू आहे. सत्तेचा गैरवापर सुरू आहे. गद्दार निघून गेले जे निष्ठावंत आहेत ते आमच्यासोबत राहिलेत. एम. के मढवी यांनी न ऐकल्याने पोलिसांमार्फत धमकी दिली जाते. एन्काऊंटर केले जाईल. ही गंभीर बाब आहे. एका कुटुंबावर आत्महत्या करण्याची वेळ येते. याबाबत मी आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पोलीस आयुक्तांशी बोललो आहोत. महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय. प्रत्येक शिवसैनिकाला अशाप्रकारे त्रास दिला जात आहे. हे सगळं जनता उघड्या डोळ्याने बघते अशी प्रतिक्रिया खासदार राजन विचारे यांनी दिली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"