मुंबई - राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीवरून सध्या राज्यातील राजकीय तापमान वाढलेले असातानाच निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. या निवडणुकीमधून जुलै महिन्यात रिक्त होणाऱ्या १० जागा भरल्या जातील. यासाठी २० जून रोजी मतदान होणार असून, त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होती.
येत्या ७ जुलै रोजी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकरांसह, विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार दिवाकर रावते, सदाभाऊ खोत, विनायक मेटे, प्रसाद लाड, सुजितसिंह ठाकूर, संजय दौंड यांचा कार्यकाळ संपणार आहे. तर एक जागा रामनिवास सिंह यांच्या निधनामुळे रिक्त झाली आहे.
दरम्यान, विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार या निवडणुकीसाठी २ जून रोजी अधिसूचना जारी होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख ९ जून असेल. १० जून रोजी अर्जांची छाननी होणार आहे. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत ही १३ जून असेल. २० जून रोजी विधान परिषदेच्या १० जागांसाठी मतदान होणार आहे. सकाली ९ ते संध्याकाळा ४ या वेळेत हे मतदान होणार आहे. त्यानंतर ५ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल.
विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाल्याने आता किती विद्यमान आमदारांना पुन्हा संधी मिळते आणि कुणाचा पत्ता कट होणार याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.