छत्रपतींचा पुतळा बनवण्याचं काम ठाण्यातील कंत्राटदाराकडे; सुप्रिया सुळेंचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 05:28 PM2024-08-26T17:28:10+5:302024-08-26T17:29:06+5:30
ही प्रधानमंत्री आणि जनतेची देखील उघड फसवणूक आहे. या पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे का झाले यासह इतर अनेक गोष्टींची कसून चौकशी होणे गरजेचे आहे असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
मुंबई - नौदलदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेल्या मालवणातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आहे. या घटनेनंतर राज्यभरात शिवप्रेमींकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. विरोधकांनीही या घटनेवरून महायुती सरकारला टार्गेट केले आहे. तर हा पुतळा बनवण्याचं काम ठाण्यातील कंत्राटदारांकडे होते त्याला काळ्या यादीत टाका अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
याबाबत सुप्रिया सुळेंनी ट्विट करत वर्क ऑर्डर पोस्ट केली आहे. त्या कॅप्शनमध्ये म्हटलंय की, सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आज कोसळला, तो पुतळा उभारण्याचे काम ठाणे जिल्ह्यातील कंत्राटदाराकडे सोपविण्यात आले होते. त्याने आपले काम कसे केले असावे हे आता उघड झाले आहे. ही व्यक्ती आणि तिची संस्था यांना सर्व खात्यांच्या काळ्या यादीत टाकायला हवे, अशी आमची मागणी आहे असं त्यांनी सांगितले.
सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आज कोसळला, तो पुतळा उभारण्याचे काम ठाणे जिल्ह्यातील कंत्राटदाराकडे सोपविण्यात आले होते. त्याने आपले काम कसे केले असावे हे आता उघड झाले आहे. हि व्यक्ती आणि तिची संस्था यांना सर्व खात्यांच्या काळ्या यादीत… https://t.co/GMHKxiDzahpic.twitter.com/lmacA8HKZZ
— Supriya Sule (@supriya_sule) August 26, 2024
तसेच देशाचे पंतप्रधान जेव्हा एखाद्या स्मारकाचे तथा वास्तूचे उद्घाटन करतात तेव्हा त्याचे काम दर्जेदारच असेल जनतेला खात्री असते. परंतु सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा वर्षभरातच कोसळला. हा छत्रपती शिवरायांचा अवमान आहे. विशेष म्हणजे या स्मारकाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ४ डिसेंबर २०२३ रोजी करण्यात आले होते. ज्याअर्थी एक वर्षही पूर्ण न होता हा पुतळा कोसळला त्याअर्थी त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले होते हे उघड आहे. या अर्थाने ही प्रधानमंत्री आणि जनतेची देखील उघड फसवणूक आहे. या पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे का झाले यासह इतर अनेक गोष्टींची कसून चौकशी होणे गरजेचे आहे असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
...कसलीही तडजोड करू नये
छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गात उभारण्यात आलेला पूर्णाकृती पुतळा केवळ आठ महिन्यातच कोसळणे अतिशय गंभीर आहे. असे नित्कृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांची व संबंधित अधिकाऱ्यांची निष्पक्ष चौकशी व्हावी. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक म्हणजे शिवभक्तांना ऊर्जा देणारे "शक्तीस्थळ" असते, हे स्मारक उभारताना किमान पुढील एका शतकाचा विचार करणे आवश्यक असते. मात्र, केवळ विशिष्ट व्यक्तीच्याच हातून अनावरण करण्यासाठी त्यांच्या सोयीनुसार स्मारकांचे काम घाईघाईत उरकण्याची दुर्दैवी प्रथा सध्या देशात प्रचलित होत आहे असा आरोप खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गात उभारण्यात आलेला पूर्णाकृती पुतळा केवळ आठ महिन्यातच कोसळणे अतिशय गंभीर आहे. असे नित्कृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांची व संबंधित अधिकाऱ्यांची निष्पक्ष चौकशी व्हावी.
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक म्हणजे शिवभक्तांना ऊर्जा देणारे "शक्तीस्थळ"… pic.twitter.com/PveInR7gnv— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) August 26, 2024
त्याशिवाय सिंधुदुर्ग येथील भंग पावलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा सन्मानाने उभारण्यात यावा, यावेळी कोणाच्याही स्वार्थासाठी कामाच्या दर्जासोबत कसलीही तडजोड करू नये ही माझ्यासह तमाम शिवभक्तांची इच्छा आहे. घडलेली घटना दुर्दैवी असली तरी शिवभक्तांनी शांतता राखावी, कायदा व सुव्यवस्था भंग होऊन छत्रपती शिवरायांच्या विचारांना धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन अमोल कोल्हे यांनी केले आहे.